Six accused arrested in Milindnagar murder case
नांदेड, पुढारी वृत्तसेवा जुन्या नांदेडमधील मिलिंद नगर भागात गुरुवारी सायंकाळच्या थरारक घटनेमध्ये २५ वर्षीय तरुणाची हत्या झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रेमप्रकरणातून झालेल्या या हत्येप्रकरणी स्थानिक पोलिसांनी सहा आरोपीना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सक्षम गौतम ताटे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो नांदेडमध्येच वास्तव्यास होता. एका युवतीसोबत असलेले त्याचे प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी या प्रेमसंबंधास विरोध दर्शवून सक्षम वाटे यास मुलीला भेटण्यास व बोलण्यास मज्जाव केला होता. पण हे प्रेमप्रकरण पुढे जात असल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सक्षम ताटे हा मिलिंद नगर येथे गेलेला असताना मुलीच्या कुटुंबातील तिघांनी त्याच्याशी वाद घातला. नंतर प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. त्यात आरोपीनी सक्षमवर गोळया झाडल्या. एक गोळी त्याच्या बरगडीमध्ये घुसली. नंतर त्याच्या डोक्यावर फरशी घातल्याने तो जागीच मरण पावला.
वरील घटनेनंतर पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे व अन्य अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण माहिती घेतली. प्राथमिक चौकशीतच आरोपींची नाचे निष्पन्न होताच पोलीस यंत्रणेने प्रथम एकाला आणि शुक्रवारी दुपारपर्यंत या प्रकरणातील सर्व सहा आरोपींना ताब्यात घेतले. गजानन बालाजी मामीडवार, त्यांची पत्नी, दोन मुले आणि दोन मुलांचे मित्र इत्यादींचा आरोपीमध्ये समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेत्तील वेगवेगळ्या कलमांसह अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांनी दिली.
आरोपींपैकी काहींची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे, असे सांगण्यात आले तर मृत सक्षम ताटे याचे वडील हे अपंग असून मुलाचा खून झाल्यानंतर त्याची आई संगीता ताटे यांनी इतवारा पोलीस ठाण्यामध्ये आरोपोंविरुद्ध तक्रार नोंदविली. आपल्या मुलाचा खून करण्यापूर्वी आरोपींनी घरी येऊन धमकावले होते, अशी माहिती समोर आली आहे.