महायुतीच्या पराभवानंतर नांदेड भाजपाच्या स्थानिक नेत्यांचे मौन ! file photo
नांदेड

Nanded News : महायुतीच्या पराभवानंतर नांदेड भाजपाच्या स्थानिक नेत्यांचे मौन !

पक्षाचे संघटनमंत्री शनिवारी शहरामध्ये

पुढारी वृत्तसेवा

Silence from local BJP leaders in Nanded following the Mahayuti's defeat!

नांदेड, विशेष प्रतिनिधी : मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाल्यानंतर भाजपाचे स्थानिक नेते खा. अशोक चव्हाण तसेच पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मौन बाळगल्याचे गुरुवारी दिसून आले. या पक्षाच्या काही जाणत्या कार्यकर्त्यांनी या पराभवाचे खापर राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या स्थानिक यंत्रणेवर फोडले.

या मतदारसंघाच्या मागील तीन निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजपाने आपला उमेदवार दिला होता; पण प्रत्येक निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला पराभव आला. यंदाच्या निवडणुकीत भाजपा नेत्यांनी आपला स्वतंत्र उमेदवार द्यावा, अशी मागणी ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती; पण वरिष्ठ पातळीवर झालेल्या वाटाघाटीत मराठवाडा विभागाची जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांवर चव्हाण यांचा प्रचार करण्याचा प्रसंग ओढवला होता; पण या उमेदवाराने नांदेडमध्ये पक्षाच्या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना महत्त्व दिले नाही. परिणामी भाजपाचे कार्यकर्ते केवळ नावापुरतेच प्रचारामध्ये दिसले.

पक्षाच्या एका माजी पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार काटी कार्यकर्त्यांनी सतीश चव्या यांच्या यंत्रणेतील प्रमुखांशी संपर्क साधला होता; पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. मतदानाच्या दिवशी केंद्राबाहेरील टेंटमध्ये बसा, खिचडी भजी खा, असे सांगितले गेले. एकंदर परिस्थिती पाहून भाजपाच्या अनेक क्रियाशील कार्यकर्तानी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याच्या प्रक्रियेतून अंग काढून घेतले. खा. अशोक चव्हाण व आ.अमरनाथ राजूरकर यांनी मतदानाच्या दिवशी बऱ्याच केंद्रांना भेटी दिल्या.

भाजपाची आज बैठक

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक संपल्यानंतर भाजपाकडून संघटनात्मक बाबी सुरू झाल्या आहेत. या पक्षाचे महानगर जिल्ह्याचे पदाधिकारी मंडळ तसेच मोर्चा व प्रकोष्ठ अध्यक्षांची महत्त्वाची बैठक शुक्रवारी दुपारी शिवाजीनगर परिसरातील महानगर कार्यालयात होणार असल्याचे येथे जाहीर करण्यात आले. या बैठकीच्या निमंत्रणात महानगर सरचिटणीसांना आवश्यक तो मान देण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पक्षाचे प्रदेश संघटनमंत्री अजय जामवाल व सह संघटनमंत्री सतीश धोंड हे ३१ तारखेला येथे येत असून त्यांच्या उपस्थितीत विभागीय बैठक होणार आहे.

शनिवारी पदयात्रा व सभा

भाजपाच्या वतीने येत्या शनिवारी 'लोकतंत्र बचाओ, भीडतंत्र हटाओ' पदयात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता तरोडेकर चौकातून निघणारी ही पदयात्रा महात्मा फुले पुतळ्यासमोर येणार आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांनी कळविले आहे. या पदयात्रेचा मार्ग, सभास्थळ तसेच विभागीय बैठक याचा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT