Minister Sanjay Shirsat : अशोकराव भाकरी खातात का नोटा ? File Photo
नांदेड

Minister Sanjay Shirsat : अशोकराव भाकरी खातात का नोटा ?

मंत्री संजय शिरसाट यांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena Minister Sanjay Shirsat criticizes BJP leader MP Ashok Chavan

विशेष प्रतिनिधी

नांदेड : वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांच्यावर त्यांच्या कर्मभूमीत तोफ डागली आहे. चव्हाण परिवाराकडे असलेल्या वेगवेगळ्या एजन्सींचा संदर्भ देत, अशोकराव भाकरी खातात का नोटा असा सवाल शिरसाट यांनी भोकर येथील सभेमध्ये केला.

नांदेड जिल्ह्यात १३ नगर परिषदांसाठी निवडणूक होत असून त्यांतील भोकर आणि मुदखेड या नगरपालिकांत खा. चव्हाण यांना मित्रपक्षांतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिव-सेना या दोन्ही पक्षांनी आव्हान दिले आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी खा. चव्हाण आणि आ. चिखलीकर यांच्या वाक्युद्ध चाललेले असताना बाहेरून येणारे नेतेही चव्हाणांवर निशाणा साधून लोकांच्या टाळ्या मिळवत आहेत.

भोकर नगर परिषदेत शिवसेनेने माजी राज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांचे चुलतबंधू सुभाष किन्हाळकर यांना नगराध्यक्षपदासाठी उभे केले असून मंत्री शिरसाट यांनी सोमवारी तेथे जोरदार टोलेबाजी केली.

मंत्री शिरसाट यांना नांदेड-भोकर प्रवासादरम्यान आ. हेमंत पाटील यांनी खा. चव्हाण यांच्या व्यवसायाची माहिती दिली. ही एजन्सी त्यांच्याकडे, ती एजन्सी त्यांच्याकडेच... असल्याचे ऐकल्यानंतर अशोकराव भाकरी खातात का, नोटा असा प्रश्न आपल्याला पडला असल्याचे शिरसाट म्हणाले. सर्व जणं भाकरीच खातात.

कोणाला एक लागते कोणाला जास्त लागते. मग अशोकरावांना एवढा पैसा कशाला हवा, असा सवाल शिरसाट यांनी केला. आम्ही प्रामाणिक आहोत. आमच्याकडे हरामाचा पैसा नाही, असेही त्यांनी बोलताबोलता नमूद केले. भोकरमध्ये जेथे लेआऊट पाडले आहेत तेथे जायला रस्ते बांधण्यात आले आहेत; पण जेथे लोक राहतात तेथे रस्ते नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

वरील सभेस आ. हेमंत पाटील यांच्यासह प्रल्हाद इंगोले, बाळासाहेब देशमुख तरोडेकर, प्रमोद देशमुख, शिवाजी किन्हाळकर, माधव जाधव आदी उपस्थित होते. भोकर नगर परिषदेला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी मला एक संधी द्या, असे आवाहन उमेदवार सुभाष किन्हाळकर यांनी केले. अशोक चव्हाण काँग्रेस पक्षात असताना, २०१७च्या मनपा निवडणुकीत तेव्हाचे तसेच सध्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी अशोकराव हे लीडर नव्हे तर 'डीलर' असल्याचे म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT