

नांदेड : जिल्ह्यात नगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीतील भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमधील वड्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली असताना आता नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांना त्यांच्या बॅनरवर आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचा फोटो लावण्यास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मज्जाव केला आहे. एवढेच नव्हे तर यापुढे कुठल्याही बॅनरवर आ. चिखलीकरांचा फोटो लावू नये, असा सज्जड दम माजी जि.प. सदस्य साहेबराव धनगे यांनी दिल्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी-शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने येण्याचे संकेत मिळाले आहेत.
नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्याहस्ते लिंबगाव जिल्हा परिषद गटांमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळे सुरु आहेत. यानिमित्त लिंबगाव गटात अनेक ठिकाणी आ. कल्याणकर यांनी लावलेल्या बॅनरवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांना स्थान दिले आहे. यात आ. चिखलीकरांचाही फोटो झळकला. परंतु या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना भूमिपूजन कार्यक्रमात डावलण्यात आले. आमच्याच गटात होत असलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण नसताना आ. चिखलीकरांचा फोटो बॅनवरवर लावून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आ. कल्याणकर करीत असल्याचा आरोप साहेबराव धनगे यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींसह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना डावलून स्वतः आ. कल्याणकर विकास कामांचे भूमिपूजन करीत आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात तीव्र नाराजी पसरली आहे. यापुढे कुठल्याही कार्यक्रमांच्या बॅनरवर आ. चिखलीकरांचा फोटो दिसता कामा नये, असा इशारा धनगे यांनी दिला आहे.
भाजप-राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी-शिवसेना या मित्रपक्षांतील प्रमुख नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने महायुतीत सुरु असलेल्या गोंधळी राजकारणामुळे कार्यकर्तेही गोंधळून गेले आहेत. विशेष म्हणजे आ. बालाजी कल्याणकर यांनी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह महापालिका निवडणुकीत महायुती होणारच नाही, असे भाकीत जवळच्या कार्यकर्त्यांपुढे वर्तविले असल्याने हा गोंधळ आणखी वाढला आहे.