Shankarrao Chavan : असे नगरसेवक..असे नगराध्यक्ष : ठेकेदाराने दिलेले पैसे फेकून देणारे शंकरराव File Photo
नांदेड

Shankarrao Chavan : असे नगरसेवक..असे नगराध्यक्ष : ठेकेदाराने दिलेले पैसे फेकून देणारे शंकरराव

आपल्या पदाचा उपयोग जनसेवेसाठी करु आणि दुस-यांदा नगराध्यक्ष होणार नाही असे शंकररावांनी अध्यक्षपद स्वीकारतांना सांगितले होते.

पुढारी वृत्तसेवा

Shankarrao, who threw away the money given by the contractor

उमेश काळे

केंद्र आणि राज्यस्तरावर मंत्री, मुख्यमंत्री म्हणून राहिलेल्या अनेक नेत्यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात नगरसेवक, नगराध्यक्षपदापासून झाली. त्यापैकी शंकरराव चव्हाण आणि शिवराज पाटील चाकूरकर यांनी थेट केंद्रीय गृहमंत्रीपदापर्यंत मजल मारली. या पदावर असताना ठेकेदाराने दिलेली लाच न घेता त्याच्यावर गुन्हा दाखल करणारे शंकरराव चव्हाण हे कदाचित पहिलेच नगराध्यक्ष असावेत.

शंकरराव चव्हाण हे नांदेडला स्थायिक झाल्यानंतर १९५२ साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. काँग्रेस पक्षाने त्यांना हदगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. पण या निवडणुकीत त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. यानंतर नांदेड नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत ते चौफाळा वाॕर्डातून तीन हजारांवर मतांनी निवडून आले. त्यानंतर नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळवित नागनाथराव परांजपे यांचा पराभव केला. नांदेडच्या पहिल्या नगराध्यक्षपदी ते विराजमान झाले.

आपल्या पदाचा उपयोग जनसेवेसाठी करु आणि दुस-यांदा नगराध्यक्ष होणार नाही असे शंकररावांनी अध्यक्षपद स्वीकारतांना सांगितले होते. पहाटे पाच वाजता सायकलवरून ते शहरात फेरफटका मारीत आणि स्वच्छतेची पाहणी करत. सार्वजनिक आरोग्यासाठी भूमीगत गटारे योजना त्यांनी राबविली. त्याकाळी पालिकांना कोणतेही अनुदान शासनाकडून मिळत नसे. शहर विकासाच्या योजना राबविण्यासाठी पैसा गरजेचा असल्याने त्यांनी मालमत्ता कर आकारणी सुरु केली. त्यास प्रचंड विरोध झाला. विरोधाला न जुमानता योजना राबविल्यामुळे लेबर काॕलनी वसाहत, तंत्रनिकेतन इमारत, अभ्यासिका, वाचनालय उभे राहिले.

प्रा. डॉ. सुरेश सावंत यांनी शंकररावांवर लिहिलेल्या पुस्तकात शंकररावांनी ठेकेदाराकडून घेतलेली लाच नाकारल्याचा प्रसंग नमूद केला आहे. शंकरराव चव्हाण हे घरात जेवण करीत असताना ठेकेदाराने त्यांच्या शिपायाकडे एक हजाराचे पाकिट दिले व साहेबांना देण्यास सांगितले. जेवण झाल्यानंतर त्यांना पाकिट मिळाल्यावर शंकरराव संतप्त झाले व पायजमा, बनियनवर त्यांनी कलेक्टर आॕफिस गाठले. तेव्हा भुजंगराव कुलकर्णी हे जिल्हाधिकारी होते. त्यांच्याकडे तक्रार करून पोलिस अधीक्षक पातूरकर यांना सांगून संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंदविण्यास भाग पाडले.

सायकलचा वापर

आजकाल नगरसेवक वर्षभरात किती संपत्ती जमा करतो हे चित्र दिसतेच आहे. शंकररावांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत एका पैशाचाही अपव्यय केला नाही. शासकीय कामासाठी हैदराबादला जावे लागत असे. ते रेल्वेचे तृतीय श्रेणीचे तिकिट काढून मित्राकडे जात. तेथे किरायाने सायकलीचा वापर करीत. सास-यांनी त्यांना सायकल घेऊन दिली होती. त्याकाळी सायकलीला दिवा बंधनकारक असे. एकदा दिवा नसल्यामुळे हवालदाराने त्यांना अडविले. चव्हाणांनी राजकीय बळ वापरले असते तर हवालदाराची घाबरगुंडी उडाली असती. पण त्यांनी नियमानुसार कोर्टात जाऊन दंड भरला व सायकल सोडून आणली. असे नगराध्यक्ष आता होणे नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT