

सेनगाव ( नांदेड ) : जिल्ह्यातील मागास असलेल्या सेनगाव तालुक्यातील गणेशपूर या छोट्याशा खेड्यातील गोपाळ समाजातील कन्या वैष्णवी बबनराव वाणी हिने ऐतिहासिक यश संपादन करत जिल्ह्यातील गोपाळ समाजातील पहिली एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. वैष्णवीला प्रतिष्ठित राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे येथे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला असुन तिच्या या यशामुळे संपुर्ण समाजात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोपाळ समाज हा भटक्या-विमुक्त समाजातील एक घटक असुन, वैष्णवीने सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करत आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर हे यश मिळवले आहे. तिच्या या यशामुळे समाजातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी दिशा मिळणार आहे. वैष्णवीच्या घराण्यात शिक्षण आणि विचारांची समृद्ध परंपरा आहे. तिचे आजोबा अर्जुनराव वाणी हे गणेशपुर या गावाचे माजी पोलिस पाटील आहेत. त्यांनी कठीण परिस्थितीत आपल्या दोन्ही मुलांना शिक्षण दिले. वैष्णवीचे वडील बबनराव वाणी हे सध्या मुंबई महानगरपालिकेत कार्यरत आहेत तर काका शेकुराव वाणी हे प्राथमिक शिक्षक म्हणुन छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असून समाजकार्यात सक्रिय आहेत. वैष्णवी वाणी हिचे यश केवळ तिच्या कुटुंबापुरते मर्यादित नसुन संपुर्ण गोपाळ समाज, गणेशपुर गाव तसेच जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात अभिमानाची नोंद राहणार आहे.