Umri Kalgaon Tanda Jal Jeevan Mission Incomplete Pudhari
नांदेड

Nanded Water Scarcity | कळगाव तांड्यात तीव्र पाणीटंचाई; जलजीवन मिशनची कामे अर्धवट, ग्रामस्थ संतप्त

उमरी तालुक्यातील कळगाव व कळगाव तांडा येथे जलजीवन मिशनच्या रखडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे तीव्र पाणीटंचाई

पुढारी वृत्तसेवा

Umri Kalgaon Tanda Jal Jeevan Mission Incomplete

उमरी : उमरी तालुक्यातील कळगाव व कळगाव तांडा येथे जलजीवन मिशनच्या रखडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन पेरणीच्या हंगामात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, अर्धवट कामे तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

उमरीच्या उत्तर दिशेला वसलेल्या कळगाव आणि कळगाव तांड्याची एकत्रित लोकसंख्या सुमारे दोन हजारांच्या घरात आहे. परिसरात भूजल मुबलक प्रमाणात उपलब्ध असतानाही जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेची कामे गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या योजनेतील पाईपलाईन, पाण्याची टाकी आणि विहिरीची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर विहिरीची खोली ६० फूट असताना प्रत्यक्षात केवळ ४० फूट खोदकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पाण्याच्या टाकीचे बांधकामही तीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेतच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या संदर्भात ग्रामस्थांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पाणीपुरवठा विभागाकडे निवेदन देऊन निकृष्ट आणि अपूर्ण कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांना देयके अदा करू नयेत, अशी मागणी केली होती. मात्र कामाचा दर्जा न तपासताच संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारांची बिले मंजूर केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

व्यंकटराव केसगीरे, सचिन डांगे, गोविंदराव यमलवाड, बालाजी डांगे, खंडेराव केसगीरे, आनंदराव नंदगाये, दतराम चंचलवार, दिगंबर केसगीरे, देवानंद डांगे, बालाजी कदम, रामदास पांचाळ, योगेश राठोड, संजय डांगे, मारुती केसगीरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी याबाबत लेखी निवेदन दिले आहे.

पाणीपुरवठ्याची व्यवस्था कोलमडल्याने गावकऱ्यांना दरवर्षी सुमारे चार हजार रुपये खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत असल्याची शोकांतिका निर्माण झाली आहे. गावातील विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असूनही अपूर्ण आणि निकृष्ट कामांमुळे जलजीवन मिशनचा लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचलेला नाही.

ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदने देऊन तसेच तोंडी पाठपुरावा करूनही संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. कामांची पाहणी करण्यासाठी अधिकारी घटनास्थळी येत नसल्याने ठेकेदारांची मनमानी वाढल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईस जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना अनेक वेळा निवेदने देऊन तसेच तोंडी सांगूनही काहीच उपयोग झालेला नाही. यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष घालून कामे पूर्ण केली तर गावातील पाणीटंचाईची समस्या तातडीने दूर होऊ शकते.
— व्यंकटराव केसगीरे, ग्रामस्थ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT