

A silent march by senior citizens arrived in the scorching heat
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि घटनात्मक हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाच्यावतीने (फेसकॉम) बुधवारी (दि. 10) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर नांदेड येथे शांततापूर्ण नागरी हक्क संरक्षण लक्षवेधी निवेदन देण्यात आले. दरम्यान, राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी डॉ. हंसराज वैद्य यांनी केली आहे.
उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम नांदेडचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांचा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात जिल्हाभरातील पाच हजारांहून अधिक ज्येष्ठ महिला, पुरुष नागरिक सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मूक मोर्चाला सुरुवात झाली. ज्येष्ठांचा हा मूकमोर्चा असल्याने कोणत्याही घोषणा
नव्हत्या. मूकमोर्चात ज्येष्ठ नागरिकांच्या चहापाणी नाश्त्याची सोय सामाजिक कार्यकर्ते गोपालसिंह बिसेन यांच्या प्रांगणात सुरज ग्रुपचे चेअरमन, सुप्रीम गोल्ड कंपनीचे मालक नांदेड भूषण रमेश पारसेवार यांनी केली होती.
ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या
६५ ते ७० वय वर्षांच्या वृद्धांसाठीच्या योजना ६० वय झालेल्या नागरिकांसाठी लागू कराव्यात, त्यांना दरमहा पाच हजार रुपये मानधन द्यावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, विधान परिषदेवर प्रत्येक एक ज्येष्ठ स्त्री, पुरुषाला प्रतिनिधित्व द्यावे आणि सन २००७, सन २०१० आणि सन २०१३ च्या कायद्याची अंमलबजावणी करावी.