दहा दिवसांच्या बाळाला घेऊन सावित्रीची लेक देतेय परीक्षा ! file photo
नांदेड

दहा दिवसांच्या बाळाला घेऊन सावित्रीची लेक देतेय परीक्षा !

शिक्षणाची धडपड पाहून पीपल्स कॉलेजमध्ये मातृस्नेही कक्षाची स्थापना

पुढारी वृत्तसेवा

Savitri's daughter is taking the exam with a ten-day-old baby!

नांदेड : पुढारी वृत्तसेवा : पाठीवर बाळाला बांधून झाशीच्या राणीने स्वातंत्र्याची लढाई लढली होती, तद्वतच दहा दिवसांचे बाळ सोबत घेऊन एक माता शिक्षणाची लढाई लढत आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या पीपल्स महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेच्या निमित्ताने हे प्रेरणादायक वास्तव समोर आले. ही सावित्रीची खरीखुरी लेक मुलींसह एकूणच विद्यार्थी समुदायापुढे आदर्श आहे.

कॉपीमुक्ती अभियान आणि सोशल मीडियावरील बोभाटा यामुळे यंदा परीक्षा प्रचंड चर्चेत आहेत. बहुतेक प्रकार नकारात्मक आहे. या परीक्षांचा सर्वाधिक फटका बसला तो कॉपीबहाद्दरांबरोबर त्यांचे होलसेल गुत्ते घेणाऱ्या ग्रामीण भागातील शिक्षण संस्था व पर्यवेक्षणीय यंत्रणेला; परंतु याचबरोबर काही प्रोत्साहित करणाऱ्या घटनाही समोर आल्या. कंधारच्या नवरंगपुरा येथील एका परीक्षा केंद्रावर जन्मजात हात हिरावले गेल्याने पायाच्या बोटांत पेन धरून पेपर सोडविणारा विद्यार्थी असो वा आता पीपल्स महाविद्यालयात दहा दिवसांच्या, अजून हे विश्व नीट पाहू न शकलेल्या तान्ह्या बाळाला घेऊन परीक्षा देणारी माता असो. ही या काळातील ठळक उदाहरणे.

१० फेब्रुवारीपासून इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. नांदेड शहरातील पीपल्स महाविद्यालयात परीक्षा केंद्र असून एकूण ८६१ परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. प्रशासनाच्या वतीने परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात येत आहे. येथे एका आईने आपल्या दहा दिवसांच्या तान्हुल्या बाळाला घेऊन बुधवारी (दि.१८) राज्यशास्त्राचा पेपर दिला.

बाळ दोन दिवसांचे असताना ती आपल्या बाळाला घेऊन बहिणीसोबत पीपल्स महाविद्यालय परीक्षा केंद्रावर पोहचली होती. तिची शिक्षणाची धडपड पाहन पीपल्स महाविद्यालय परीक्षा केंद्राद्वारे मातृस्नेही कक्षाची स्थापना केली व या कक्षात बाळासाठी झुल्याची व्यवस्था करण्यात आली. बाळाला झोळीत झोपवून ती आता पेपर देत आहे. शीतल चंद्रकांत चित्ते (२१) असे या मातेचे नाव आहे.

नांदेड शहरातील श्री बसवेश्वर महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. पतीला अर्थार्जनासाठी कर्तव्यावर जावे लागते. विभक्त कुटुंब पद्धतीत तान्ह्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी कोणी नाही. अशा वेळी एखादी माता परीक्षा टाळू शकली असती; पण प्रचंड महत्त्वाकांक्षी व अडचणीला न डगमगणाऱ्या शीतलने बाळांतपणातच परीक्षा केंद्र गाठले. आपले शैक्षणिक एक वर्ष वाया जाऊ नये, या तळमळीने ती आईची माया जपत मायारुपी या जगात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत आहे.

शिक्षणप्रेमी कुटुंबाचे कौतुक

शीतल चित्ते नांदेड येथील रहिवासी आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यांना शिक्षण घेण्याची प्रचंड इच्छा आणि ती पूर्ण करण्याची तळमळ असून शक्य ती धडपड करण्याची तयारी आहे. त्यामुळे कुटुंबीय सुद्धा त्यांना पूर्ण साथ देतात. त्यांनी बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांना कुटुंबीयांचे प्रोत्साहन आहे. या शिक्षणप्रेमी कुटुंबाचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT