

नांदेड : नागेली येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ ग्रामस्थांनी खासदार क्रिकेट चषक सोहळा आयोजित केला होता. यातील विजयी संघांना पारितोषिक वितरण करण्यासाठी आलेल्या काँग्रेस खा. रवींद्र चव्हाण यांनी क्रिकेट खेळाडूंची मने जिंकलीच; परंतु गावच्या अर्धवट रस्त्याचाही प्रश्न निकाली काढला आहे. क्रिकेटच्या मैदानासहित रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून राजकीय मैदानही त्यांनी मारल्याने एकाच दौऱ्यातील दोन षटकारांची चर्चा ग्रामस्थांत होत आहे.
मागच्या काही वर्षांत नागेली हे गाव तसे राजकीयदृष्ट्या केंद्रस्थानी राहिले आहे. जिल्हा बँकेचे संचालक गोविंदराव नागेलीकर यांनी खा. अशोक चव्हाण यांच्या सोबत भाजपाची वाट धरली. त्यांनतर नागेली गावात ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाची धुरा दादाराव पुयड यांनी सांभाळली आहे; त्याच्या सुरस चर्चा आता नायगावपासून शिवाजी नगरातही रंगू लागल्या आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गावातील युवकांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ क्रिकेट सामने आयोजित केले होते.
त्या सामन्यांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय संघांना यावेळी खा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि रोख स्वरूपात पारितोषिक देण्यात आले. यावेळी काशिनाथ शिंदे या युवकाने बारड ते नागेली गावच्या अर्धवट रस्त्याच्या संदर्भात लेखी निवेदन देत खा. चव्हाण यांचे लक्ष वेधले होते.
खा. रवींद्र चव्हाण यांनी रस्त्याच्या कामातील उर्वरित डांबरीकरण करण्यासाठी संबंधितांना सूचना केल्यानंतर दोन दिवसांत रस्त्याचे डांबरीकरणही सुरू झाले आहे. त्यामुळे एकीकडे ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला असताना दुसरीकडे खा. रवींद्र चव्हाण यांनी मारलेल्या क्रिकेट सहित राजकीय षटकारांची जोरदार चर्चा आहे.
यावेळी पारितोषिक सोहळ्यात प्रा. यशपाल भिंगे, राजेश पावडे, तिरुपती कोंडेकर, प्रताप देशमुख, दादाराव पुयड, बालाजी शिंदे, गणपत शिंदे, प्रशांत मुंगल, गंगाधर डांगे व क्रिकेप्रेमींची उपस्थिती होती.