Indian Painted Frog Pudhari
नांदेड

Indian Painted Frog | नांदेडमध्ये दुर्मिळ 'इंडियन पेंटेड फ्रॉग' आढळला; स्थानिक जैवविविधतेसाठी महत्त्वपूर्ण नोंद

अधिवास संवर्धनाची गरज : प्रा. डॉ. संदीप चेडे

पुढारी वृत्तसेवा

Nanded Environmental News

उमरखेड : नांदेड शहरातील एका निवासी परिसरात दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या 'इंडियन पेंटेड फ्रॉग' (Uperodon taprobanicus) या बेडकाच्या प्रजातीची नोंद झाली आहे. स्थानिक जैवविविधतेच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे. प्रा. डॉ. विशाल मराठे यांच्या निवासस्थानी हा बेडूक आढळून आला.

बेडकाच्या आकर्षक रंगसंगतीमुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक रचनेमुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर गो. सी. गावंडे महाविद्यालय, उमरखेड येथील प्राणिशास्त्रज्ञ तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेचे सदस्य प्रा. डॉ. संदीप चेडे यांनी त्याची पाहणी करून हा 'इंडियन पेंटेड फ्रॉग' असल्याची अधिकृत पुष्टी केली.

प्रा. डॉ. चेडे यांनी सांगितले की, ही प्रजाती प्रामुख्याने जमिनीखाली राहणाऱ्या (Fossorial) जीवनशैलीसाठी ओळखली जाते. वर्षातील बहुतांश काळ हे बेडूक जमिनीखालीच वास्तव्य करतात आणि मुसळधार पावसानंतर विणीच्या हंगामात तात्पुरत्या पाणथळ जागांजवळ बाहेर येतात. त्यांच्या पाठीवरील आकर्षक रंगसंगती हे या प्रजातीचे खास वैशिष्ट्य आहे.

मराठवाड्यातील दुर्मिळ नोंद

'इंडियन पेंटेड फ्रॉग' ही प्रजाती प्रामुख्याने दक्षिण भारत आणि श्रीलंकेच्या काही भागांत आढळते. मात्र, मराठवाड्यासारख्या निम-ओसाड प्रदेशात या प्रजातीची नोंद होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. शहरी अथवा निम-शहरी परिसरात या बेडकाचे दर्शन होणे, बदलत्या पर्यावरणाशी वन्यजीव जुळवून घेत असल्याचे संकेत मानले जात आहेत.

अधिवास संरक्षणाची गरज

या शोधाच्या पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. संदीप चेडे यांनी उभयचर प्राण्यांच्या संवर्धनाची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, "उभयचर हे पर्यावरणाच्या आरोग्याचे महत्त्वाचे जैविक संकेतक आहेत. नांदेडमध्ये या दुर्मिळ भुयारी बेडकाचा शोध लागणे म्हणजे आपल्या स्थानिक परिसंस्थेत समृद्ध जैवविविधता अद्याप अस्तित्वात असल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा आहे.

मात्र, झपाट्याने होणारे शहरीकरण, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि हंगामी पाणथळ जागांचे होत असलेले नुकसान यामुळे या प्रजातींच्या अस्तित्वावर गंभीर संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवासाचे संरक्षण, सूक्ष्म परिसंस्थांचे जतन आणि व्यापक जनजागृती करणे अत्यावश्यक आहे."

या शोधाचे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था, उमरखेडचे प्रभाकर दिघेवार, गजानन रासकर, दीपक ठाकरे, विष्णू दुधेवार, देविदास कानडे, राजेश भोकरे यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे. या नोंदीमुळे परिसरातील दुर्लक्षित उभयचर जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण आणि संवर्धनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT