Nanded news : पावसाची टक्केवारी आणि शेतकरी मृत्‍यूचे शतक पूर्ण !  File Photo
नांदेड

Nanded news : पावसाची टक्केवारी आणि शेतकरी आत्महत्यांचे शतक पूर्ण !

अतिवृष्टीनंतर नांदेड जिल्ह्यातील 'करुण आणि दारुण' चित्र

पुढारी वृत्तसेवा

Rainfall percentage and farmer deaths complete century!

विशेष प्रतिनिधी

नांदेड : २०२५ हे वर्ष नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने 'एकीकडे हसू तर दुसरीकडे आसू' असे परस्परविरोधी ठरत आहे. पावसाळा संपण्यास किमान तीन आठवडे शिल्लक असतानाच जिल्ह्याच्या पर्जन्यमानाने १५ सप्टेंबरपूर्वीच टक्केवारीमध्ये शंभरी पार केली. पुढील काळासाठी ही बाव दिलासादायकच; पण दुसऱ्या बाजूला वर्ष सरण्यापूर्वीच जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचेही शतक पूर्ण झाल्याचे दारुण चित्र समोर आले आहे.

आश्लेषा, मघा, पूर्वा आणि उत्तरा या चार नक्षत्रांदरम्यान जिल्ह्याच्या १६ तालुक्यांतील ९३ महसूल मंडळांपैकी बहुसंख्य मंडळांना जबर तडाखे देत वरुणाने यंदा अतिकरुणा केल्यामुळे सबंध जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. पण राज्यातील सरकारने या जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या विशेष मदतीची घोषणा अद्यापही केलेली नाही. सबंध जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाची घनगर्द छाया पसरली आहे.

जिल्ह्यामध्ये १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये पडणाऱ्या पावसाची सरासरी ८९१ मि.मी. इतकी आहे. पण यंदा १५ सप्टेंबरपर्यंतच ९१६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून या पावसाची टक्केवारी १०२च्या पुढे गेली आहे. काही तालुक्यांमध्ये तर वार्षिक सरासरीच्या सव्वा ते दीड टक्के इतका पाऊस नोंदला गेला. या अतिपावसामुळे शेतीसोबतच पशुधन आणि मालमत्तांचीही मोठ्या प्रमाणावर हानी झाली. अतिवृष्टी आणि पुरामुळे २१ व्यक्ती आतापर्यंत दगावल्या आहेत. बाधित कुटुंबांची संख्या १६ हजारांवर असून त्यापैकी केवळ ११०० कुटुंबांना मदतीचे वाटप झाले. प्रशासनाकडील नोंदींनुसार ५३१ जनावरे आतापर्यंत दगावली आहेत.

अतिवृष्टीमुळे झालेली दाणादाण समोर आलेली असतानाच १ जानेवारीपासून ते १० सप्टेबरपर्यंत जिल्ह्यातील ११० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. २०१४ पासून प्रशासनस्तरावर शेतकरी आत्महत्यांची नोंद सुरू झाली. २०१५ साली सर्वाधिक म्हणते १९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यानंतरच्या वर्षांत १८० आत्महत्यांची नोंद झाली. प्रत्येक वर्षी शेतकरी आत्महत्यांचे शतक जिल्ह्यात पूर्ण झाले. यंदा गेल्या ९ महिन्यांत सर्वाधिक आत्महत्या भोकर आणि हदगाव विधानसभा मतदारसंघात (प्रत्येकी २२) झाल्याचे दिसून येते.

सप्टेंबर अर्धा झाला असताना हवामान खात्याचे इशारे मात्र एकामागे एक सुरू आहेत. सोमवारीसुद्धा दिवसभर प्रचंड उकाड्याने रात्री जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. यावेळी प्रथमच सप्टेंबरच्या मध्ये सर्वच तालुक्यात पावसाने टक्केवारीची शंभरी ओलांडली आहे. कंधार, लोहा, किनवट, मुदखेड आणि अर्धापूर या तालुक्यात तर १४० टक्क्‌यापेक्षा अधिक पाऊस पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अपवाद वगळता ९३ पैकी बहुतेक मंडळामध्ये सुद्धा १०० पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. एक जूनपासून आजपर्यंत जेवढा पाऊस पडणे अवेक्षित आहे. त्यापेक्षा तब्बल २५ टक्के पाऊस अधिक पडला. गतवर्षी सुद्धा १० टक्के पाऊस अधिक पडल्याची नोंद होती.

१९ वर्षांनंतर पावसाचा उच्चांक

दोन पिढ्यांच्या स्मरणातील पावसाचे अवलोकन केले असता २००६ साली पावसाने नांदेड जिल्ह्यात हाहाकार माजविला होता. त्यावेळी सुद्धा सर्व नद्या, धरणे ओसंडून वाहिले. मागील तीन वर्षांतसुद्धा सरासरी एवढा पाऊस झाला. परंतु यावेळी जेमतेम महिनाभरात पावसाने जो धुमाकूळ घातला तो कल्पनेपलिकडे आहे. या पावसाने जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांचे वास्तवही उघडे पाडले. अजूनही पावसाचे एक मोठे नक्षत्र हस्त शिल्लक असल्याने पाऊस टक्केवारी दीड शतके वाटचाल करतो की काय, अशी शक्यता दिसते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT