

Goods worth Rs 11 lakh seized in three raids
नांदेड, पुढारी वृत्तसेवा
अतिवृष्टीमुळे आलेल्या नदी नाल्यांचे पूर ओसरत चालले असताना अवैध वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांनी पुन्हा आपले डोके वर काढले असून जिल्ह्याच्या तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करताना पोलिसांनी तब्बल ११ लाखाांचा ऐवज जप्त केला आहे. तिघांना अटक करण्यात आली असली तरी सहा जण मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जातो. गेल्या दोन ते अडीच महिन्यात या ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेकडो कारवाया करत लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला. तरीही वाळूमाफियांचे उद्योग सुरूच आहेत. कोणत्याही परिस्थितीत अवैध वाळू उपसा किंवा वाहतूक होणार नाही यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैधरीत्या गौण खणीज (वाळू, मुरुम) याचा उपसा होऊन वाहतूक होणार नाही याबाबत सर्वच अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, निष्काळजीपणा अढळल्यास कारवाईचा दम देण्यात आला होता.
वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी रात्री विष्णुपुरी धरण प्रकल्पातील गोदावरी नदीकाठी छापा घातला. पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत शिंदे, पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांचे पथक रात्रीची ग्रस्त घालत असताना अवैध वाळू उपश्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी अतिरिक्त मनुष्यबळ बोलावून छापा घातला. तेथे दहा ब्रास वाळू, एक इलेक्ट्रिकल मोटर, वायर व अन्य साहित्य असा तब्बल ३ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला.
तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. अन्य एका घटनेत लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव तेलंग येथील नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या करण सुनील क्षीरसागर (वय ३५) यासह अन्य काही जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. लिंबगावचे सपोनि पंढरीनाथ बोधनकर, पोउपनि निजाम मुसा, राम बैनवाड, टाक हे ग्रस्त घालून परतत होते. शुक्रवारी त्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी धावले, पोलिस आल्याची कुणकुण लागल्यानंतर वाळुमाफियांनी अक्षरशः नदीपात्रात उड्या मारल्या. पोलिस जमादार राम बैनवाड यांनीही मोठे धाडस करत नदीपात्रात उडी मारून इंजीनला दोरीने बांधून किनाऱ्यावर आणले. या इंजिनची किंमत ४ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. दोन इंजिन काही तराफे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
माहूर येथे ट्रॅक्टर पकडला
माहूर तालुक्यातल्या महादापूर येथील पैनगंगा नदीला जोडलेल्या नाल्यातून अवैध वाळू उपसा करून इवळेश्वरकडे नेले जात असताना पोलिस निरीक्षक गणेश कराड, पोउपनि संदीप अन्येबोइनवाड यांच्या पथकाने आरोपींना जागेवरच पकडून गुन्हा दाखल केला. अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग सुरू केला पण चालाख वाळूमाफियांनी ट्रॅक्टरची ट्रॉली सोडून पळ काढला. या प्रकरणात वाळू, ट्रॅक्टर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.