

Bananas were also affected by the flood, the price was reduced by half
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: मागील महिन्यात पुराने घातलेल्या थैमानाने विविध क्षेत्र प्रभावित होत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. केळी सुद्धा त्यातून सुटू शकली नाही. नांदेडमधील केळी दिल्ली, पंजाब या भागात तसेच तिथून पुढे अरब देशात पाठवली जाते. परंतु अतिवृष्टी व पूर यामुळे पुरवठा थांबल्याने दर थेट निम्म्यावर आले आहेत.
ऑगस्ट महिन्यात पावसाने कहर केला. एकतर संततधार सुरू होती. त्यात अधूनमधून होणाऱ्या अतिवृष्टीने सर्वच पिकाचे नुकसान झाले. शेतशिवारात पाणी साचल्याने उत्पादन व दर्जावर परिणाम झाला. हा पाऊस नांदेड किंवा मराठवाड्यापेक्षा उत्तर भारतात प्रचंड प्रमाणात झाला.
नांदेड जिल्ह्यात पाच तालुक्यांत प्रामुख्याने केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. ही केळी दिल्ली, पंजाब तसेच या मार्गाने कतार, इराण व अन्य अरब देशात पाठवली जाते. परंतु वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने स्थानिक बाज- ारपेठेशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे स्वाभाविकच दर घसरले. श्रावणात २००० रुपये प्रतिक्विंटल पेक्षा पुढे गेलेला भाव निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. सध्या बाजारात ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल या दराने केळी विकली जात आहे. किरकोळ बाजारात मात्र ६० रुपये डझन हा भाव कायम आहे.