PM Fasal Bima Yojana pudhari photo
नांदेड

PM Fasal Bima Yojana : किनवटमध्ये खरीप विम्याला यंदा वाढता प्रतिसाद

गतवर्षीपेक्षा ९,५१८ शेतकरी वाढले; अर्जसंख्येत १०,५३० ची भर; ५४ हजार ५१ अर्ज, ४३ हजार हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण

पुढारी वृत्तसेवा

PM Fasal Bima Yojana: Increasing response to Kharif Insurance in Kinwat this year

अरुण तम्मडवार

किनवट : पीकविमा योजनेच्या कडक अटी व शेतकऱ्यांच्या हिश्श्यात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागांत विमा अर्जाची संख्या घटत असताना किनवट तालुक्यात मात्र यंदा गतवर्षीच्या तुलनेत १० हजार ५३० अर्जाची वाढ झाली आहे. नऊ महसूल मंडळांतून ३३ हजार ४३६ शेतकऱ्यांनी ५४ हजार ५१ अर्ज दाखल केले असून, ४३ हजार ४.३२ हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण मिळाले आहे. विशेष म्हणजे, नांदेड जिल्ह्याची पीकविमा अर्जसंख्या राज्यात सर्वाधिक असल्याचेही समोर आले आहे.

गतवर्षी किनवट तालुक्यात २३ हजार ९१८ शेतकऱ्यांनी ४३ हजार ५२१ अर्ज दाखल केले होते. यंदा शेतकऱ्यांची संख्या ३३ हजार ४३६ झाली असून, ९ हजार ५१८ शेतकऱ्यांची म्हणजे ३९.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. अर्जसंख्येतही २४.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी ३१ हजार ६२५.३७ हेक्टर क्षेत्र विम्याखाली होते. यंदा हे क्षेत्र ४३ हजार ४.३२ हेक्टरवर पोहोचले असून, त्यात ११ हजार ३७८.९५ हेक्टरची वाढ झाली आहे.

यंदा विमा भरण्याची प्रारंभीची अंतिम मुदत ३१ जुलै होती. त्यानंतर ती वाढवून १० ऑगस्ट करण्यात आली. या मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी अतिरिक्त कालावधी मिळाला. त्यामुळे कडक अर्टीच्या पार्श्वभूमीवरही किनवटमधील विमा सहभाग वाढण्यास या मुदतवाढीचा हातभार लागल्याचे दिसून येते.

यंदाच्या ५४ हजार ५१ अर्जामध्ये २८६ कर्जदार आणि ५३ हजार ७६५ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. गतवर्षी ४२९ कर्जदार व ४३ हजार ९२ बिगर कर्जदार असे एकूण ४३ हजार ५२१ अर्ज होते. म्हणजेच कर्जदार शेतकऱ्यांच्या अर्जात १४३ ने घट झाली असली, तरी बिगर कर्जदारांच्या अर्जात तब्बल १० हजार ६७३ ने वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण अर्जसंख्येत लक्षणीय वाढ झाली.

यंदा किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांनी ५ कोटी ३७ लाख ६६८ रुपये ६ पैसे विमा हप्ता भरला आहे. राज्य व केंद्र शासनाचा प्रत्येकी ३ कोटी ४ लाख ४८ हजार २५१ रुपये ८५ पैसे हिस्सा आहे. त्यामुळे एकूण विमा हप्ता ११ कोटी ४५ लाख ९७ हजार १७१ रुपये ७५ पैसे झाला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना २६८ कोटी ७८ लाख ८९ हजार ८८८ रुपये ८५ पैशांचे विमाकवच मिळाले आहे.

महसूल मंडळनिहाय पाहता इस्लापूरमध्ये सर्वाधिक ८ हजार १७३ अर्ज, तर शिवणीमध्ये ८ हजार ७९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ बोधडी ७ हजार ५७४, सिंदगी (मोहपूर) ५ हजार ६७३, जलधारा ५ हजार ५२४, दहेली ५ हजार २६८, किनवट ५ हजार ४४३, उमरी बाजार ४ हजार ३१३ आणि मांडवी ४ हजार ४ अर्ज दाखल झाले आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत शेतकरी संख्या, अर्जसंख्या आणि विमा संरक्षित क्षेत्र या तिन्ही बाबींमध्ये झालेली वाढ लक्षवेधी असून, कडक अर्टीच्या पार्श्वभूमीवर बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा वाढलेला सहभाग ही यंदाच्या किनवटच्या विमा आकडेवारीची ठळक बाब ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT