गावस्करांच्या सदनिकेसाठी पंतांनी शोधला होता ‘कायदेशीर मार्ग!’ file photo
नांदेड

गावस्करांच्या सदनिकेसाठी पंतांनी शोधला होता ‘कायदेशीर मार्ग!’

त्यांनी आपल्या शासकीय सेवेतील ठिकठिकाणच्या लक्षणीय आठवणी ‘आत्मभान’ या आत्मकथेत लिहिल्या. त्यामध्येच गावस्करांच्या सदनिकेसाठी संबंधित संस्थेला जादा एफएसआय कशाप्रकारे दिला गेला, हे त्यांनी नमूद केले.

पुढारी वृत्तसेवा

Pant Balekundri had found a ‘legal route’ for Gavaskar’s apartment!

संजीव कुलकर्णी

नांदेड : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील मनोहर गावस्कर यांना मुंबईच्या वरळी भागातील ‘स्पोटर्स फिल्ड’ गृहनिर्माण संस्थेचे सभासदत्व आणि या सोसायटीतील सदनिका मिळवून देण्यात नुकतेच निवर्तलेले माजी मंत्रालयीन अधिकारी गो.श्री.पंतबाळेकुंद्री यांनीच ‘कायदेशीर मार्ग’ काढला होता.

शासनाच्या नगरविकास विभागामध्ये रचना साहाय्यक या पदापासून नोकरी सुरू करणारे आणि तब्बल ३४ वर्षांच्या सेवेत शेवटी उप सचिवपदापर्यंत पदोन्नत झालेल्या तसेच सेवानिवृत्तीनंतर नगर नियोजनाशी संबंधित वेगवेगळ्या जबाबदार्‍या कुशलतेने पार पाडलेल्या पंतबाळेकुंद्री यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या शासकीय सेवेतील ठिकठिकाणच्या लक्षणीय आठवणी ‘आत्मभान’ या आत्मकथेत लिहिल्या. त्यामध्येच गावस्करांच्या सदनिकेसाठी संबंधित संस्थेला जादा एफएसआय कशाप्रकारे दिला गेला, हे त्यांनी नमूद केले.

वसंतदादा पाटील हे तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते. नगरविकास खातेही त्यांनी आपल्याकडेच ठेवलेले. या काळात गावस्करांचे एक पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून नगरविकास खात्यामध्ये आले. स्पोर्ट्स फिल्ड या क्रिकेटपटुंच्या सोसायटीमध्ये गावस्कर यांना सामावून घेण्यासाठी संस्थेला जादा चटईक्षेत्र (एफएसआय) देण्याची गरज निर्माण झाली होती; पण एका व्यक्तीसाठी असे जादा क्षेत्र कायद्यानुसार देता येत नव्हते, अशी तेव्हाची परिस्थिती होती.

हा विषय सचिवांकडून पंतांकडे आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा आधी अभ्यास केला. सोसायटीचे अध्यक्ष अजित वाडेकर यांच्याशी चर्चा केली. नंतर त्यांनी वरळी भागात या संस्थेला दिलेल्या भूखंडाची प्रत्यक्ष पाहणीही केली. प्रत्यक्ष पाहणीमध्ये या भूखंडाच्या मागील बाजूची जमीनही सरकारीच होती. त्या जमिनीतील काही भाग स्पोटर्स फिल्ड संस्थेच्या भूखंडाला जोडून सुमारे ८०० चौरस फूट जागा वाढविण्याचा मार्ग पंतबाळेकुंद्री यांनी शोधून काढला.

पुढील टप्प्यात महसूल विभाग, गृहविभाग या संबंधित विभागांकडे जाऊन पंतबाळेकुंद्री यांनी संबंधित अधिकार्‍यांच्या कानावर हे प्रकरण घातले आणि शेवटी त्यांनी गावस्करांचा वरील सोसायटीतील प्रवेश सुकर करून दिला. नंतरच्या काळात आवश्यक त्या प्रक्रिया झाल्यानंतर गावस्कर यांना तेथे सदनिका मिळाली; पण या सबंध काळात पंतबाळेकुंद्री आणि गावस्कर यांची प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही. याच प्रकरणाचा उल्लेख महसूल विभागातील माजी अधिकारी रा.गो.वर्तक यांनीही आपल्या प्रकाशित डायरीमध्ये केला होता.

आत्मभान पुस्तकामध्ये पंतबाळेकुंद्री यांनी १९६५ ते १९९६ या कालावधीतील अनेक घटना-प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनेक माजी मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांशी त्यांचा जवळून संबंध आला. १९८० ते ९६ अशी सलग १६ वर्षे मंत्रालयातल्या नगरविकास विभागात ते कार्यरत राहिले. त्यांची एकंदर ख्याती ऐकल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी पंतांना आपल्या कक्षात खास बोलावून घेतले, तर १९९५ साली मुख्यमंत्री झालेल्या मनोहर जोशी यांच्याकडे पंतबाळेकुंद्री यांनी भेट घेण्याविषयीचा निरोप पाठविला तेव्हा एका पंतांकडे येण्यासाठी दुसर्‍या पंतांना भेट मागण्याची गरज काय, असा उलट निरोप जोशींकडून गेला.

मंत्रालयात असताना पंतबाळेकुंद्री यांची ओळख अडकित्ता आणि सुपारी यामुळेही ठळक झाली. मंत्रालयात आल्यानंतर आपल्या पायातील बूट ते आपल्या दालनात काढून ठेवत व कोल्हापुरी चप्पल वापरत असत. त्यांच्या टेबलवर अडकित्ता आणि खाली बूट दिसले म्हणजे पंत मंत्रालयात आहेत, याची संबंधितांस खात्री पटत असे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT