Nanded News : केवळ १० टक्के पाऊस; २९ टक्के जलसाठा, पेरण्या लांबल्या file photo
नांदेड

Nanded News : केवळ १० टक्के पाऊस; २९ टक्के जलसाठा, पेरण्या लांबल्या

गतवर्षीपेक्षा कमी पाऊस, शेतकऱ्यांचे पांडुरंगाला साकडे

पुढारी वृत्तसेवा

नांदेड, पुढारी वृत्तसेवा मृग कोरडे गेल्यानंतर आर्द्राकडून सर्वांनाच पावसाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु आठवडा उलटला तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. परंतु त्याचा शेतीला फायद्यापेक्षा तोटाच अधिक झाल्याचे दिसून येते. दि. १ जूनपासून आजवर केवळ १०.६२ टक्के पऊस झाला असून जलसाठा झपाट्याने आटत चालला आहे. सध्या केवळ २८ टक्के साठा उरला आहे. यामुळे पेरांना विलंब होत असून दिंड्या पंढरीकडे निघाल्या असल्या तरी वारकऱ्यांचे संपूर्ण लक्ष आभाळाकडे लागून राहिले आहे.

गतवर्षी दि. २८ जूनपर्यंत १४१.३० मिलीमीटर अर्थात १५.८५ टक्के पाऊस झाला होता. तर दि. ३० जून रोजीपर्यंत १४३.७० मि.मी. म्हणजे १६.१२ टक्के पाऊस पडला होता. यावर्षीही पावसाचा प्रवास अतिशय निराशाजनक असून जून महिना संपायला जेमतेम दोन दिवस शिल्लक असताना आजवर केवळ ९४.७० मिमी म्हणजे १०.६२ टक्के पाऊस झाला आहे.

गतवर्षी किनवट, माहूर व हिमायतनगरात २०० मिमी

पेक्षा जास्त पाऊस जूनअखेर पडला होता. त्यामुळे त्या भागातील पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या होत्या. परंतु यंदा या भागातही पावसाचे प्रमाण निराशाजनक असून किनवटमध्ये केवळ १७१.७० मिमी., माहूरमध्ये ११४.१४ तर हिमायतनगरात ७२ मिमी पाऊस झाला आहे.

दि. ८ जून रोजी बेडूक वाहन घेऊन सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला. परंतु हे संपूर्ण नक्षत्र कोरडे तर गेलेच, परंतु तापमानाचा पारा प्रचंड उंचीवर होता. त्यानंतर दि. २२ जून रोजी गाढवावर स्वार होऊन सूर्यनारायण आर्द्रा नक्षत्रात प्रविष्ट झाले. परंतु मागील आठ दिवसांत पाऊस पडला, पण, त्याचे प्रमाण अतिशय अनियमित व विस्कळीत राहिले आहे. मराठवाडयाच्या काही भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे जमीन खरडून गेल्याच्या तक्रारी आहेत.

तर काही मागात किरकोळ पाऊस पडला. त्यामुळे दोन्ही ठिकाणी पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे, अशांनी किरकोळ पावसावर पेरण्यांना सुरुवात केली आहे.

दशकापूर्वी शेतकरी पेरण्या आटोपून दिल्यांच्या माध्यमातून पंढरपूरच्या वारीत सहभागी होत असत. ठिकठिकाणाहून असंख्य दिड्या पंढरीकडे मार्गस्थ होत असत. परंतु अलीकडे पावसाचे वागणे अतिशय लहरी झाले असून जुलैअखेर पावसाला सुरुवात होत आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये सतत व जोरदार पाऊस पडत असल्याने पिकांचे वाटोळे होत आहे.

गतवर्षी जुलैच्या मध्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. परंतु ऑगस्टमध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे चांगली पिकू लागलेली शेती वाया गेली. त्यामुळे यंदा पेरणीच्या बाबतीत अधिक सजग दिसून येतो.

विष्णुपुरीत ३६ टक्के जिवंत जलसाठा

जून संपत आला असताना विष्णुपुरी प्रकल्पात ३६.५० टक्के जलसाठा आहे. येलदरीमध्ये ५१.४६, लोअर दुधनामध्ये २५.१८, लिबोटीमध्ये २४.४४ आणि बारुळ धरणात ४०.४९ टक्के जलसाठा आहे. इसापूर धरणात ४३.४७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा साठा समाधानकारक असला तरी पावसाची नाराजी पाहता आहे ते पाणी जपून वापरावे लागणार आहे. शासनाने विशेष आदेश काढून सिंचनासाठीचा उपसा थांबवला असला तरी लवकर पाऊस झाला नाही तर खोळंबलेल्या पेरण्यांवर संक्रांत येऊन ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT