Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

खरिपासह केळी लागवड खोळंबली, अल निनोचे गडद सावट !
Nanded Rain
पिकांना पावसाची प्रतीक्षाFile Photo
Published on
Updated on

Waiting for heavy rains continues in Nanded district

नांदेडः पुढारी वृत्तसेवा जून महिना अखेरच्या टप्प्यात पोहोचला तरी नांदेड जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. २६ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ७१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, या कालावधीतील १३४.७० मि.मी. सरासरीच्या केवळ ५२ टक्के पावसाची नोंद आहे. अलनिनोच्या गडद सावटात बळीराजा आज पेरणीयोग्य दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून त्याची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.

गतवर्षी २६ जूनपर्यंत जिल्ह्यात १३५ मि.मी. पाऊस झाला होता, म्हणजेच सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडला होता. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे उलट असून जून महिना संपत आला तरी वार्षिक सरासरीच्या अवघ्या ८ टक्के पावसाचीच नोंद झाली आहे. त्यामुळे अल निनोच्या प्रभावाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरणीयोग्य दमदार पाऊस नसल्याने सोयाबीनची पेरणी खोळंबली आहे. दुसरीकडे केळी लागवडीचाही वेग मंदावला असून, इसापूर धरण पुरेसे भरणार की नाही, या भीतीने केळी उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

सिंचन सुविधा असलेल्या काही भागांतच शेतकऱ्यांनी हळद लागवड सुरू केली आहे. विशेष म्हणजे २७ जून रोजी सकाळ पासूनच सूर्य आग ओकत होता. जून महिन्यातील अपेक्षित ढगाळ वातावरणाऐवजी कडक उन्हामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. तालुकानिहाय आकडेवारीत किनवट तालुक्यात सर्वाधिक १३९ मि.मी. (८४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे,

तर नायगाव तालुक्यात सर्वात किमी ३२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग चिंतेत असून त्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत. दरम्यान, पेरणी योग्य पाऊस झाल्याखेरीज शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे.

अपेक्षित पाऊस नाही; बळीराजा चिंतेत !

सध्या जिल्ह्यात अर्धापूर-मुदखेड तालुक्यात केळी लागवड सुरू आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर केळी लागवडीचा वेग कमी होऊ शकतो. अपेक्षित पाऊस पडला नाही तर केळी आणि ऊस पिकाच्या सरासरी लागवडीवर संकट ओढवू शकते. त्यामुळे आज अपेक्षित न पडणारा पाऊस पुढील दोन-तीन वर्षांसाठी बळीराजाच्या संकटात भर घालणारा ठरू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा आजतरी चिंतेत दिसून येतोय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news