घोगरेंना मारहाण; आता आ.चिखलीकरांवर ताण ! pudhari photo
नांदेड

Nanded Politics : घोगरेंना मारहाण; आता आ.चिखलीकरांवर ताण !

‌‘एसआयटी‌’ चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः माझे अपहरण करून मला झालेली मारहाण आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सांगण्यावरूनच झाली आहे. मारहाण करणारे अट्टल गुन्हेगार आहेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन झालेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी मला दिले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस जीवन घोगरे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

22 डिसेंबर रोजी अपहरण व झालेल्या जबर मारहाणीनंतर जीवन घोगरे यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत घटनेची सविस्तर माहिती दिली. एका चार चाकी वाहनातून माझे अपहरण झाले. डोक्यावर पिस्तुल आणि तलवारीचा धाक दाखवून आ.चिखलीकरांच्या नादी लागू नको, तुला व तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू, अशी धमकी देत मला जबर मारहाण करण्यात आली. नशीब बलवत्तर म्हणून मी त्या संकटातून वाचलो. जिल्हा पोलिस अधीक्षक आणि ग्रामीण पोलिसांनी तत्काळ नाकेबंदी केल्यामुळे हल्लेखोरांना अटक झाली.

माझ्या आग्रहाखातर अजित पवारांनी चिखलीकरांना पक्षात प्रवेश दिला, कंधार-लोहा मतदारसंघात उमेदवारी दिली. पक्षात येताच त्यांची हुकूमशाही सुरू झाली. नेत्यांना भेटण्यास मला मज्जाव करण्यात आला. माझ्यावर कर्ज झाल्याचा आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मला मारहाण करणारे गुंड त्यांनी पोसलेले आहेत. चिखलीकरांच्याच गाडीमध्ये ते फिरत असतात. त्यांच्याकडे गुंडांची टोळी आहे, असाही आरोप जीवन घोगरे यांनी केला आहे.

मी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचीही भेट घेणार आहे. त्यांनी बीड प्रमाणेच नांदेडकडेही लक्ष द्यावे, अशी आपण त्यांना विनंती करणार आहोत. वाल्मिक कराड केवळ बीडमध्येच नाही, तर नांदेडमध्येही एक वाल्मिक कराड कार्यरत असून अनेकांच्या जमिनींवर कब्जा करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता चिखलीकरांनी हडप केली आहे, असेही घोगरे म्हणाले.

  • मनपा निवडणुकीत नांदेड दक्षिणमध्ये युती, तर नांदेड उत्तरमध्ये जाणीवपूर्वक युती न करण्याचा ‌‘प्रताप‌’ त्यांनी केला आहे. पक्षात त्यांची दादागिरी सुरू आहे. हा सर्व प्रकार मी पक्षश्रेष्ठींना भेटून सांगणार आहे, असेही जीवन घोगरे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT