Nandedkar gave a message of unity through 'Run for Unity'
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : देशाच्या अखंडतेचे प्रतीक सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज (दि.३१) साजरी करण्यात आली. त्यानिमित्त पोलिस विभागाच्या वतीने रन फॉर युनिटी या विशेष रॅलीचे आयोजन केले होते. त्याला नांदेडकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, रॅलीच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत, एकतेतच शक्ती आहे, देश एक जन एक अशा घोषणा देत शौर्य सेवा आणि एकतेचा संदेश देण्यात आला.
सकाळी जुना मोंढा टॉवर येथून या रॅलिला जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरूवात झाली. दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, जिल्हा परिषदेच्या प्रशासक मेघना कावली, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती.
जुना मोंढा टॉवर येथून निघालेल्या रॅलीचा महावीर चौक, वजिराबाद चौक मार्गे जावून पोलिस अधीक्षक कार्यालयात समारोप झाला. रॅलिमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी हातात तिरंगा घेऊन राष्ट्रीय एकतेसाठी धावुया असे म्हणत एकतेचा सामूहिक जबाबदारीचा आणि देशहिताचा संदेश दिला. विशेष म्हणजे सदर रॅलिमध्ये विविध धर्मांचे धर्मगुरूही सहभागी झाले होते.
या रॅलीत वरील मान्यवरांसह शासकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, भाजपाचे महानगराध्यक्ष अमर राजुरकर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्यासह नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भारताची शक्ती एकतेत आहे
पोलिस विभागाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलित नांदेडकर सहभागी होत भारताची शक्ती एकतेत आहे, असा संदेश दिला. दरम्यान मान्यवरांनीही पटेल यांच्या कार्याचा आणि राष्ट्रीय ऐक्याच्या विचारांचा गौरवपूर्व उल्लेख केला.