उमरखेडः ग्रामीण व शहरी भागामध्ये शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने, छोट्या छोट्या गावात देखील इंग्रजी कॉन्व्हेंट, इंग्रजी शाळा अशी दुकानदारी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य व गरीबांसाठी असलेल्या जिल्हा परिषद शाळांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत. अशावेळी गावातील ग्रामपंचायत ने जिल्हा परिषदेची शाळा वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील पोफाळी ग्रामपंचायतीने एकमताने ठराव घेऊन तशा प्रकारचे आवाहन गावातील नागरिकांना केले आहे.
पोफाळी, (वसंत नगर) ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनानुसार जे ग्रामस्थ स्वतःच्या पाल्यांना मुले किंवा मुली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन प्रवेश घेतील त्या पालकांच्या मालमत्तेवरील घरपट्टी व पाणीपट्टी चालू वर्षाचा पूर्ण कर माफ होईल. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्याकरता सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे अशी विनंती देखील केलेली आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये शिक्षण प्रणाली मध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झाला असून २०१० पासून शिक्षक भरती बंद आहे. त्यातच लाखो शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु शिक्षणासारख्या अतिशय महत्त्वाच्या व संवेदनशील विषयाकडे शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी झाली. याचाच फायदा उचलून इंग्रजी शाळाचे पेव फुटले. आज स्वयंअर्थसहायीत इंग्रजी शाळा पालकांकडून अमर्याद पैसे वसूल करत आहेत.
त्यांच्या भपक्या देखाव्याला पालक वर्ग बळी पडत आहे. सध्या स्पर्धेच्या युगात जास्तीत जास्त पैसे घेणारी शाळा चांगली अशा प्रकारचे वातावरण निर्माण करून पालकांची खिसे कापण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. अशावेळी पोफाळी वसंतनगर ग्रामपंचायतच्या सरपंच रेखा संतोष शिरसागर, उपसरपंच मनीषा सतीश पायघणे व ग्राम विकास अधिकारी ओ. एस. कोथळकर यांनी पुढच्या भविष्याचा विचार करून ग्रामस्थांना आवाहन केले आहे ही बाब अतिशय कौतुकास्पद असल्याचे परिसरात बोलले जात आहे. या धर्तीवर तालुक्यातील इतरही ग्रामपंचायत असे आवाहन करतील का? याकडे लक्ष लागले आहे.