

किनवट : अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवळ यांच्या २ जून रोजी झालेल्या सहस्त्रकुंड (ता. किनवट) येथील दौऱ्यावेळी तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर या कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहिल्या नसल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे शासकीय राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचे नमूद करत ही कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, मंत्री झिरवळ यांचा दौरा कार्यक्रम ई-मेल व व्हॉट्सअॅपद्वारे तहसीलदार यांना पूर्वसूचित करण्यात आला होता. त्या वेळी रेल्वे स्टेशन किंवा शासकीय विश्रामगृह येथे मंत्री महोदयांचे स्वागत, आवश्यक व्यवस्था आणि राजशिष्टाचाराच्या पालनाची जबाबदारी तहसीलदारांवर होती. मात्र त्यांनी त्या वेळी उपस्थित न राहता प्रशासकीय समन्वयात अडथळा निर्माण केल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, तहसीलदार यांची ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियमांचे उल्लंघन करणारी असून, ही बाब गंभीर स्वरूपाची मानली जाईल. त्यामुळे दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समाधानकारक खुलासा न मिळाल्यास शिस्तभंगाची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या नोटीसची माहिती समोर येताच प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये काहीसा गोंधळ आणि खळबळ उडाली आहे. तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये यासंदर्भात चर्चेला उधाण आले असून, काहींनी तहसीलदार यांच्यावर झालेल्या या कारवाईला "घाईत घेतलेला निर्णय" असे म्हणत अंतर्गत समन्वयाच्या तपासणीची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या प्रकरणासंदर्भात दै. पुढारी ने तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून माहिती घेतली असता, त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कदाचित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे काही चुकीची माहिती पोहोचली असावी. कारण मी मा. मंत्री नरहरी झिरवळ साहेबांच्या दौऱ्यावेळी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित होते आणि त्यांचे स्वागतही मीच केले.”
डॉ. चौंडेकर यांनी सांगितले की, “मा. मंत्रीमहोदय सहस्त्रकुंड येथे आले असता, तिथे काही शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले होते. मी त्यांच्या समवेत त्यांच्यासोबतच असल्यामुळे त्यांनी ते निवेदन मला सुपूर्त केले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध अडचणींवर, विशेषतः सहस्त्रकुंडच्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर चर्चा झाली.”
तसेच, त्यांनी पुढे सांगितले की, “ना. झिरवळ साहेबांनी संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात चर्चा करताना अनेक पात्र नागरिक अजूनही वंचित असण्याच्या शक्यतेकडे माझे लक्ष वेधले. पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळायला हवा असे त्यांनी सांगितले. त्याबाबत त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या असून, त्या सूचनांच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना आवश्यक सेवा पुरविण्यावर आमचा भर राहील.”