

कोल्हापूर : शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमवेत झालेल्या गैरकृत्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या द़ृष्टीने सीसीटीव्ही बसविण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण 1958 शाळांमध्ये प्रत्येकी 4 या प्रमाणे 7832 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
जि.प. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर व सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रेरणा लाभली आहे. ही मोहीम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
सीसीटीव्हीमुळे शाळेचे आवार, व्हरांड्यातील हालचाली या कॅमेर्यात कैद होतील. या कॅमेर्यांचा सर्व्हर ज्या त्या शाळेतच असणार आहे. आवश्यकतेनुसार त्यातील डाटा तपासण्यात येणार आहे. सीईओ कार्तिकेयन एस. म्हणाले, यापूर्वी जि.प.च्या केवळ 52 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मिशन शाळा कवच या उपक्रमात विद्यार्थी सुरक्षेचे हे ध्येय ठेवून ही योजना पूर्ण करण्यात आली आहे. जि.प.च्या शाळेत 1 लाख 44 हजार 324 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे फायद्याचे ठरणार आहे. लोकसहभाग, तसेच ग्रामपंचायत कडील 15 वा वित्त आयोग व स्वनिधी अंतर्गत असणारी रक्कम यातून ही मोहीम राबविण्यात आली आहे. यासंदर्भात उद्या, 26 जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्हा हा ‘विद्या सुरक्षित जिल्हा’ म्हणून घोषित होणार आहे. उपशिक्षणाधिकारी शंकर यादव, सहायक कार्यक्रम अधिकारी शशिकांत कदम तसेच जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग कडील अधिकारी, कर्मचारी यांनी कामकाज पूर्ण केलेे आहे.
हे सीसीटीव्ही कॅमेरे शाळेचे मुख्य प्रवेशद्वार, ग्राऊंड, शाळेचा व्हरांडा आणि शाळेची मागील बाजू अशा चार ठिकाणी बसविण्यात आले आहेत.