नायगाव (नांदेड): नायगाव तालुक्यातील नायगाववाडी येथील तरुण शेतकरी राजेश आनंदा रेडेवाड (वय ३२) यांनी सततची नापिकी आणि खासगी कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेतला. ही दुर्दैवी घटना दि. ३० सप्टेंबर, २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घडली.
राजेश रेडेवाड हे शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, मागील काही काळापासून शेतीमध्ये सातत्याने नापिकी होत असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. त्यातच खासगी कर्जाचा वाढता बोजा असल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. या परिस्थितीतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि आई असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तीन मुलींसह कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नाम फाऊंडेशन, तालुका नायगावचे समन्वयक भाऊराव मोरे यांनी नायगाववाडी येथे भेट देऊन शेतकरी राजेश रेडेवाड यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत नाम फाऊंडेशनच्या वतीने शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
शेतकरी कुटुंबाला आधाराची गरज
तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे नायगाववाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या कुटुंबाला शासनासह सामाजिक संस्थांनी मदतीचा हात देण्याची गरज निर्माण झाली आहे.