

उमरखेड : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या एनसीएमसी कार्डच्या हेल्पलाईनवरच मराठी भाषेला डावलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी सवलतीच्या प्रवासाकरिता अनिवार्य करण्यात आलेल्या एनसीएमसी कार्डच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी महामंडळाने सुरू केलेल्या हेल्पलाईनवर संवादासाठी केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा पर्याय उपलब्ध असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
एसटी महामंडळाने सवलतीच्या प्रवासासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले आहे. मात्र, कार्ड सक्रिय करणे, रक्कम टॉपअप करणे, उपलब्ध शिल्लक तपासणे तसेच अन्य तांत्रिक अडचणींबाबत प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महामंडळाने ०२२-४२०२२१९० आणि ०२२-६९७८७३०३ हे दोन हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत. मात्र, या क्रमांकांवर संपर्क साधल्यानंतर प्रवाशांना मराठी भाषेत संवाद साधण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. एनएसडीएल पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या हेल्पलाइनवर हिंदी अथवा इंग्रजी भाषेचा पर्याय निवडावा लागत असल्याने विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
मराठी भाषेचा आग्रह; मग एसटीच्या हेल्पलाईइनवर का नाही?
एकीकडे महाराष्ट्रातील व्यावसायिक वाहनचालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचा आग्रह परिवहन विभागाकडून धरला जात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे अध्यक्षही आहेत. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवा हेल्पलाईनवरच मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नसल्याने विरोधाभास निर्माण झाल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी असलेल्या सेवेचा ग्राहक संवाद शक्यतो मराठीत उपलब्ध असावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. विशेषतः एसटीचा सर्वाधिक वापर करणाऱ्या ग्रामीण आणि ज्येष्ठ प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन हेल्पलाइनवर मराठी पर्याय तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण
एसटीने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी असून त्यातील अनेक प्रवासी ग्रामीण भागातील आहेत. एनसीएमसी कार्डच्या तांत्रिक अडचणी आधीच त्यांच्या आकलनापलीकडच्या असताना त्याबाबत हिंदी किंवा इंग्रजी भाषेत माहिती देणे अथवा समस्या समजावून सांगणे त्यांच्यासाठी अधिक कठीण ठरत आहे.
कार्ड अॅक्टिव्हेशन, टॉपअप, शिल्लक रक्कम आणि अन्य तांत्रिक प्रक्रियांबाबत मदत मिळण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असली, तरी मराठी पर्यायाच्या अभावामुळे ही सुविधा काही प्रवाशांसाठी सोयीऐवजी अडचणीची ठरत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर मराठी भाषेचा पर्याय तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.