Umarkhed Mahagaon Forest Pest Attack On Teak Trees Pudhari
नांदेड

Teak Leaves Caterpillar | सागवानाच्या झाडांवर पान पोखरणाऱ्या अळीचे संकट: झाडांची वाढ खुंटण्याची भीती

उमरखेड, महागाव वनपरिक्षेत्रासह नांदगव्हाण घाटातील सागवानाची पाने तपकिरी

पुढारी वृत्तसेवा

Umarkhed Mahagaon Forest Pest Attack On Teak Trees

प्रशांत भागवत

उमरखेड : पावसाळ्यात चारही दिशांनी हिरवाईने नटलेल्या वनराईचे मनोहारी रूप सर्वांचे लक्ष वेधून घेते. मात्र, याच हिरवाईच्या साम्राज्यात सागवानाची झाडे सध्या वेगळेच चित्र दाखवत आहेत. सागवानाची हिरवीगार पाने तपकिरी पडून पोखरल्यासारखी दिसत असून अनेक झाडे पानविरहित होण्याच्या मार्गावर आहेत. उमरखेड व महागाव वनपरिक्षेत्रासह पैनगंगा अभयारण्य परिसर आणि नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगव्हाण घाटाच्या दुतर्फा असलेल्या सागवानाच्या दाट वनराईत हा प्रकार प्रकर्षाने जाणवत आहे.

दर काही वर्षांनी सागवानाच्या पानांवर पानखाऊ अळीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे काही दिवसांतच झाडांची हिरवीगार पाने पोखरली जाऊन तपकिरी पडतात. सध्या दिसणारे चित्रही याच प्रकाराशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, नेमकी कोणती कीड किंवा रोग यासाठी कारणीभूत आहे, याची शास्त्रीय तपासणी होणे आवश्यक आहे.

पानांचा सांगाडा करून टाकणारी अळी!

सागवानावर प्रामुख्याने पान पोखरणारी अळी (Teak Defoliator) आणि पानांचा सांगाडा करणारी अळी (Teak Skeletonizer) यांचा प्रादुर्भाव आढळतो. या अळ्या सागवानाच्या पानांतील हिरवा भाग खाऊन टाकतात. सुरुवातीला पानांवर लहान छिद्रे दिसतात. त्यानंतर अळीचा प्रादुर्भाव वाढला की संपूर्ण पान कुरतडले जाते. अनेकदा केवळ पानांच्या शिरा शिल्लक राहतात. परिणामी दूरून पाहिल्यास संपूर्ण झाड करपल्यासारखे दिसते.

पावसाळ्यात सागवानाला नवीन पालवी फुटत असताना या किडींच्या प्रादुर्भावासाठी पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. तापमान, आर्द्रता, पावसाचे प्रमाण आणि अळीच्या नैसर्गिक शत्रूंची संख्या यावरही तिच्या प्रादुर्भावाची तीव्रता अवलंबून असते.

झाडांची वाढ खुंटण्याची भीती!

एकदा पाने गळाली म्हणून मोठे सागवानाचे झाड लगेच सुकत नाही. सागवानाला पुन्हा पालवी फुटण्याची नैसर्गिक क्षमता आहे. मात्र, वारंवार किंवा मोठ्या प्रमाणात पर्णनाश झाल्यास झाडाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः लहान वयाची झाडे आणि सलग पानगळ होणाऱ्या झाडांवर त्याचा परिणाम अधिक जाणवू शकतो.

सागवानाच्या पानांवर दर दोन-चार वर्षांनी अशा प्रकारचा प्रादुर्भाव होत असल्याचे स्थानिकांचे निरीक्षण आहे. त्यामुळे हा केवळ यंदाचा प्रश्न न मानता त्याची शास्त्रीय नोंद ठेवणे आवश्यक आहे.

‘अज्ञात रोग’ की किडीचा प्रादुर्भाव?

स्थानिक पातळीवर या प्रकाराला ‘अज्ञात रोग’ म्हटले जात असले तरी केवळ झाडांची पाने तपकिरी झाल्याने हा रोग असल्याचे निश्चित करता येणार नाही. पानांवरील छिद्रे, कुरतडलेला भाग, अळी अथवा तिची अंडी, पानांच्या शिरांची स्थिती आदींची तपासणी केल्यानंतरच कारण स्पष्ट होऊ शकते.

त्यामुळे वनविभागाने उमरखेड, महागाव वन परिक्षेत्र सह पैनगंगा अभयारण्य परिसरातील बाधित सागवान पट्ट्याची पाहणी करून पानांचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे.

रासायनिक फवारणी नको; जैविक उपायांचा विचार व्हावा!

वनक्षेत्रात कीड दिसली म्हणून सरसकट कीटकनाशकांची फवारणी करणे योग्य ठरणार नाही. जंगल ही स्वतंत्र आणि समतोल परिसंस्था आहे. या किडींवर नियंत्रण ठेवणारे पक्षी, परजीवी कीटक व अन्य नैसर्गिक शत्रूही वनव्यवस्थेचा भाग आहेत.

त्यामुळे प्रथम किडीची ओळख, प्रादुर्भावाची तीव्रता आणि बाधित क्षेत्र निश्चित करूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे. आवश्यक असल्यास जैविक व पर्यावरणपूरक उपायांना प्राधान्य देण्याची गरज आहे.

सर्वेक्षण करून नोंद ठेवण्याची गरज!

उमरखेड व महागाव वनपरिक्षेत्र, पैनगंगा अभयारण्य तसेच नांदगव्हाण घाटातील सागवान पट्ट्यात किती क्षेत्र बाधित आहे, किती झाडांची पाने प्रभावित झाली आहेत, कोणत्या वयाच्या झाडांवर प्रादुर्भाव अधिक आहे आणि नेमकी कोणती कीड कारणीभूत आहे, याचा सर्वेक्षण अहवाल तयार करणे आवश्यक आहे.

दरवर्षी या प्रादुर्भावाची नोंद ठेवल्यास त्याचे चक्र, वाढण्याची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना निश्चित करणे वनविभागाला सोपे होईल.

हिरवाईचे आरोग्य जपण्याचे आव्हान

उमरखेड परिसरातील सागवानाची वनसंपदा ही या भागाची नैसर्गिक ओळख आहे. पावसाळ्यात हिरवीगार दिसणारी ही वनराई सध्या तपकिरी पडल्याने निसर्गप्रेमींच्या चिंतेत भर पडली आहे. हा प्रादुर्भाव नैसर्गिक चक्राचा भाग आहे की त्यामागे बदलते हवामान, वाढती कीड अथवा अन्य कारणे आहेत, याचा शोध घेणे काळाची गरज आहे.

सागवानाची पाने गळाली म्हणून केवळ झाडांकडे पाहण्यापेक्षा त्यामागील कारण शोधून भविष्यातील वनसंपदा सुरक्षित ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. वनविभागाने तातडीने पाहणी करून या पानगळीस कारणीभूत घटक स्पष्ट करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT