

Clear the road of encroachments and strengthen it; indefinite hunger strike starting August 15!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : बारड येथील ज्ञानदीप नगर (बौद्ध गेवाडा) ) ते राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक धोंडीबा ऊर्फ भंतू आठवले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून ते १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्याच मुहूर्तावर आमरण उपोषण सुरू करणार आहेत. सुमारे ३३ फूट रुंदीची पाणंद उपलब्ध असूनही येथील प्रशासन स्थानिक राजकारणाशी संगनमत करून अतिक्रमण हटवित नसल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार करण्याची नामुष्की ओढवली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
वरील रस्ता बारडवासीकरिता प्रमुख रस्त्यांपैकी असून चिखलमय रस्त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच रस्त्यावर जुने बसस्थानक अस्तित्वात होते. परंतु आता या रस्त्याची अवस्था गलितगात्र झाली आहे. ३३ फूट पाणंद असतानाही पक्का रस्ता का होत नाही? त्यावरील अतिक्रमण का हटविले जात नाही, अशी भावना तक्रारकर्ते यांनी व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात या रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी कुठे आणि कशासाठी खर्च झाला यासंदर्भातील निष्पक्ष चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.
तसेच जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी या प्रमुख अधिकाऱ्यांनी स्थानिक राजकीय सत्ताधाऱ्यांना दूर ठेवून बारड गावाला प्रत्यक्ष भेट देऊन येथील प्रमुख समस्यांच्या वस्तुस्थितीची पाहणी करावी, अशी अपेक्षाही आठवले यांनी पत्रात व्यक्त केली आहे. सदरील रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ता मोकळा करत रस्त्याचे मजबुतीकरण झाले पाहिजे, तरच उपोषणावरून मागे हटू, अन्यथा सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असा इशाराही आठवले यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार हे आता पाहावे लागेल.
५ ऑगस्टपासून आमरण उपोषण
स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष लोटली. पुढाऱ्यांच्या घरासमोर या कडेच्या त्या कडेला चकचकीत रस्ते पहावयास मिळतात. परंतु गावातील प्रमुख रस्ते खिळखिळ झालेले असताना १५ ऑगस्ट २०२६ म्हणजेच स्वातंत्र्य दिनापासून बारड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहासमोरील बोधी वृक्षाखाली मंतू ऊर्फ धोंडिबा कोंडिबा आठवले आमरण उपोषण सुरू करणार आहेत. रस्त्याच्या निधीची चौकशी करण्यात यावी आणि कंत्राटदार दोषी आढळल्यास त्यास काळ्या यादीत टाकावे, अशीही मागणी आठवले यांनी केली आहे. आठवले यांचे सुपुत्र अनुराग यांनी संबंधित पत्र मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी आणि इतर एका सचिवास पाठवले आहे-