हळदीच्या दरावरून नांदेडमध्ये शेतकरी आक्रमक! pudhari photo
नांदेड

Nanded farmers protest turmeric rates issue : हळदीच्या दरावरून नांदेडमध्ये शेतकरी आक्रमक!

24 तासांत तोडगा न निघाल्यास दिला बाजारपेठ बंद करण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : हळदीचा स्पॉट खरेदी दर आणि बाजारपेठेच्या दरातील तफावतीमुळे नांदेडसह हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून पुढील 24 तासांत योग्य तोडगा न निघाल्यास बाजारपेठ बंद करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील राजेगोरे यांनी दिला आहे.

सध्या एनसीडेक्सवर हळदीचे दर सुमारे रू.16000 प्रति क्विंटलच्या आसपास असताना, प्रत्यक्ष बाजारात मात्र रू.13,000 ते 14,000 दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या तफावतीविरोधात शेतकऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत बाजारपेठ 19 एप्रिल रोजी बंद ठेवत आंदोलनाची सुरुवात केली.

आता नांदेड जिल्ह्यातील हळदीचा दर्जानुसार योग्य दर मिळावा, ही शेतकऱ्यांची ठाम मागणी असून यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी बाजार समितीत बैठकीला उपस्थित होते. नांदेड बाजार समितीत झालेल्या बैठकीस सभापती संजय देशमुख लहानकर, उपसभापती भुजंग पाटील डक, संचालक भगवानराव आलेगावकर, ज्ञानेश्वर राजेगोरे यांच्यासह हळद व्यापारी विजयकुमार गोयंका, आनंद धूत, प्रवीण कासलीवाल, आनंद मंत्री, प्रल्हाद काकांडीकर उपस्थित होते.

देशात मराठवाडा विभागाचा हळदी उत्पादनात सुमारे 45 टक्के वाटा असल्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. बैठकीत व्यापाऱ्यांना तोडगा काढण्यासाठी 24 तासांचा अवधी देण्यात आला आहे. यामध्ये सुवर्णमध्य काढत शेतकऱ्यांना न्याय्य दर मिळेल आणि व्यापाऱ्यांचाही तोटा होणार नाही, यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती यावेळी सभापती संजय लहानकर यांनी केली.

दरम्यान, येत्या 24 तासांत हळदीच्या दरात समाधानकारक सुधारणा न झाल्यास बाजारपेठ बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी शेतकरी माधवराव कदम कोंढेकर, श्याम पाटील कपाळे, बाळू भाऊ बास्टे, आनंद पाटील लोंढे, मारुती पाटील घोरबांड यांसह मोठ्या संख्येने हळद उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

“हळद ही शेतकऱ्यांसाठी सोन्यासारखी आहे. त्या सोन्याला दर्जानुसार योग्य भाव मिळालाच पाहिजे. येत्या 24 तासांत दरात सुधारणा झाली नाही, तर शेतकऱ्यांच्या वतीने बाजारपेठ बंद केली जाईल.”
हणमंत पाटील राजेगोरे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नांदेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT