

Market committees on radar for fraud against farmers!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा
शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी आता जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या रडारवर असून बुधवार रोजी दुपारी ठीक ३ वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालयात विविध बाजार समित्यांच्या सचिवांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या प्रकरणी हनुमंत राजेगोरे, प्रताप देशमुख, संदीप देशमुख यांनी जानेवारी महिन्यात जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती.
नांदेड जिल्ह्यात विविध बाजार समित्यांच्या अंतर्गत अडत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून सोयाबीन, हळद, मूग, उडीद, तूर व इतर शेतीमालाची खरेदी केल्यानंतर पैसे अदा न केल्याच्या अनेक तक्रारी असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याची बाब आता ऐरणीवर आली आहे. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख व काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते संदीप देशमुख यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी कर्डिले यांनी जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांना या गंभीर प्रकारणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
आता या संदर्भात जिल्हा
उपनिबंधकांनी जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सचिवांची आज, ३ फेब्रुवारी मंगळवार रोजी कार्यालयात दुपारी ३ वाजता बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणारे आडते, व्यापारी रडारवर येणार असून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील विविध अनियमितता ऐरणीवर येणार का? याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अनेक बाबी चव्हाट्यावर येणार!
विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अंतर्गत कच्च्या-पक्क्या बिलाचा अनागोंदी कारभार मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जाते. शेती मालाच्या खरेदीत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक, कर चुकवेगिरी, शेतकरी निवासाचा प्रश्न, गाळे वाटप प्रश्न, जागांची परस्पर विक्री आणि त्यातील अनियमितता अशाप्रकारच्या अनेक बाबी या बैठकीत चव्हाट्यावर येणार असून या प्रकरणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हनुमंत राजेगोरे, प्रताप देशमुख आणि संदीप देशमुख यांनी चांगलीच कंबर कसली आहे.