भोकर (नांदेड) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) नांदेड पथकाने आज भोकर येथे एक धडाकेबाज कारवाई केली आहे. मृत पत्नीच्या नावावरील शेतजमीन स्वतःच्या वारसाहक्काने व इतर नावे करण्यासाठी १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या गाव कामगार तलाठ्याला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
दि २२ ऑक्टोबर २०२६ रोजी तक्रारदार यांनी तक्रार दिली की, त्यांचे पत्नीचे नावे मौजे चिदगिरी, ता. भोकर, जि. नांदेड येथील शेत गट क्रमांक २९० मधील ८० आर शेती असून तक्रारदार यांची पत्नी मृत झाली आहे.
दि.२१ ऑक्टोबर रोजी तक्रारदार हे शेत जमीन त्यांच्या नावावर करण्यासाठी तलाठी साहेबराव टोमके याला त्याचे भोकर येथील तलाठी कार्यालयात भेटले. तलाठीने वारसदारांचे ५०० रुपयाचे बाँड पेपरवर संमतीपत्र व १२००० रुपये लाचेची मागणी केली.
दिनांक २२ ऑक्टोबर, २०२६ रोजी १६.३० वाजण्याच्या सुमारास तलाठी कार्यालय, भोकर येथे तलाठी साहेबराव टोमके याची लाच मागणी पडताळणी केली. त्याने तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या नावावरील शेतजमीन तक्रारदाराच्या नावावर करण्यासाठी १२००० रुपये लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती ५०००रुपये लाच स्वीकारण्याची व उरलेले ७००० रुपये लाच दोन दिवसानंतर स्वीकारण्याचे मान्य केले. दि. २२ ऑक्टोबर, २०२६ रोजी तलाठी कार्यालय, भोकर येथे लोकसेवक तलाठी साहेबराव टोमके यांनी तक्रारदारकडून ५००० रुपये लाच रक्कम स्वीकारले. यावेळी तलाठी रंगेहात सापडला, त्याचवेळी एसीबीने ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलीस स्टेशन भोकर, जि. नांदेड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी तलाठी साहेबराव हैबती टोमके याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्याची घरझडती व इतर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अश्विनी जगताप, आणि पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली, सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक प्रिती जाधव, तसेच सापळा पथकातील पोलीस हवालदार बालाजी मेकाले, अमोल टाक, विनय नुकलवार आणि चालक पोलीस हवालदार रमेश नामपल्ले यांनी पार पाडली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुध्द तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सअप क्रमांक ८९५६५०१०६४ वर संपर्क साधावा.