robbery news Pudhari
नांदेड

Nanded crime : बापाची आयुष्यभराची पुंजी अन् मुलाची 'गद्दारी'; मैत्रिणीच्या संगनमताने केली लाखोची चोरी!

नायगावातील ९.७० लाखांच्या चोरीचा एल सी बी च्या तपासात उलगडा

पुढारी वृत्तसेवा

बाळासाहेब पांडे

नायगाव : शहरातील व्यंकटेशनगर परिसरात घडलेल्या ९ लाख ७० हजार रुपयांच्या चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. या चोरीमागे बाहेरील टोळी नसून तक्रारदाराचाच मुलगा मास्टरमाईंड असल्याचे निष्पन्न झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात त्याला एका मैत्रिणीची साथ लाभल्याचेही तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने प्लॉट खरेदीसाठी आणि इतर आर्थिक गरजांसाठी घरात ९ लाख ७० हजार रुपयांची रोकड जपून ठेवली होती. मात्र, घरातील ही मोठी रक्कम अचानक गायब झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. याप्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली.

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घरातील हालचाली, कुटुंबीयांचे जबाब, तसेच परिस्थितीजन्य पुरावे यांची सखोल छाननी केली. सुरुवातीला घरफोडीचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले; मात्र पोलिसांच्या बारकाईच्या तपासात अनेक बाबी संशयास्पद आढळल्या. त्यानंतर संशयाची सुई घरातीलच एका व्यक्तीकडे वळली आणि पोलिसांनी तक्रारदाराच्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

सुरुवातीला संबंधित मुलाने उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने व कसून चौकशी केल्यानंतर अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मैत्रिणीच्या संगनमताने घरातीलच रोकड चोरल्याची कबुली त्याने दिल्याचे समजते. वडिलांनी घरात ठेवलेली मोठी रक्कम कुठे आहे, ती कशी ठेवलेली आहे आणि घरातील कोणत्या वेळी संधी मिळू शकते, याची संपूर्ण माहिती असल्याने त्याने हा डाव आखल्याचा तपासात उलगडा झाला.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपींकडून ९ लाख ३६ हजार रुपयांची रोकड जप्त केली असून, उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे. कुटुंबातील व्यक्तीनेच विश्वासघात करत वडिलांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारल्याने परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. “घरचा भेदी लंकेला आग” या म्हणीची प्रचिती देणारी ही घटना असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने कमी वेळात तपासाची दिशा बदलत या गुन्ह्याचा उलगडा केला. लाखोंच्या चोरीप्रकरणी घरातीलच व्यक्ती मास्टरमाईंड निघाल्याने नायगाव शहर हादरले असून, या घटनेने कुटुंबातील विश्वास, पैशांचे आकर्षण आणि तरुणाईतील चुकीच्या प्रवृत्ती यावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT