विशेष प्रतिनिधी
नांदेड ः काँग्रेसच्या माजी महापौर जयश्री पावडे, उपमहापौर राहिलेले सतीश देशमुख प्रभृतींनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर ‘कमळमय’ झालेल्या नांदेडच्या शिवाजीनगरात ‘भवरे’ही प्रगटले आहेत. ‘आनंद निलयम’मध्ये अनेकांच्या फेऱ्या सुरू झाल्या असून खा.चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांची लगबग वेग घेऊ लागली आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षातील एक चमू भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर नांदेड-वाघाळा मनपाच्या निवडणुकीसाठी खा.चव्हाण यांनी भाजपाचा मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या मतविभाजनासाठी आखणी सुरू केल्याचे दिसत आहे.
नांदेडच्या मुस्लीम-मागासवर्गीय बहुल भागातील 28 ते 30 जागा हे काँग्रेस पक्षाचे बलस्थान खा.चव्हाण व त्यांच्या निकटवर्तीयांना ठाऊक आहे. या जागांपैकी जास्तीत जास्त जागांवर स्थानिक आघाडी किंवा अन्य पर्यायांतून आपल्या पसंतीचे उमेदवार निवडून आणण्याची आणि सत्तास्थापनेत त्यांची मदत घेण्याची योजना भाजपामध्ये सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर सुभाष रायबोले आणि विठ्ठल पाटील डक या जोडगोळीने बुधवारी चव्हाणांच्या घरी भेट देऊन चर्चा केली. या गटाने एक नोंदणीकृत आघाडी स्थापन केली असून ज्या ठिकाणी भाजपा आणि कमळाला थारा नाही, त्या ठिकाणी आघाडीच्या उमेदवारांना बळ देण्याची एक योजना समोर आली आहे. वरील दोघांनी एकाच प्रभागात आघाडीतर्फे चार उमेदवार उभे करण्याची नेपथ्यरचना केली असल्याचे समोर आले.
माजी महापौर शीला भवरे यांचे पती तसेच नांदेड न.पा.चे माजी उपाध्यक्ष किशोर भवरे यांचे नाव भाजपा प्रवेशामध्ये होते. त्यांनी मंगळवारी प्रवेश घेतला नाही, तरी तेही बुधवारी शिवाजीनगरमध्ये आले होते. त्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसला, तरी त्यांच्या हालचालींतून ‘कमळाभोवती भवरे’ असे चित्र समोर आले.
भाजपामध्ये काही प्रमुख माजी नगरसेवकांची उमेदवारी जवळजवळ नक्की आहे. पण वजिराबाद, गणेशनगर,गुरुद्वारा आदी काही प्रभागांत पक्षाच्या उमेदवारीकरिता मोठी चुरस आणि रस्सीखेच दिसत आहे. जेथे पक्षासाठी काही पेच आहेत, ते दूर करण्यावर चव्हाण यांची यंत्रणा कार्यरत आहे. भाजपाच्या उमेदवार यादीत जुन्यांपैकी किती जणांना स्थान मिळणार, याकडे एक गट लक्ष ठेवून आहे.
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस गुरुवारी नांदेडला येत असून दुपारी त्यांची जाहीर सभा मुखेड येथे होणार आहे. या सभेला खा.चव्हाण उपस्थित राहणार असून ते नांदेड मनपा निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, असे सांगण्यात आले.