Sahasrakund Waterfall  Pudhari
नांदेड

Sahasrakund Waterfall | अखेर सहस्रकुंड धबधबा प्रवाहित! पैनगंगेच्या लाटांवर पुन्हा खुलले निसर्गाचे सहस्र नेत्र

विदर्भ–मराठवाड्याच्या सीमेवरील निसर्गाचा अद्भुत आविष्कार म्हणून प्रसिद्ध असलेला सहस्रकुंड धबधबा अखेर प्रवाहित झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sahasrakund Waterfall Flowing

प्रशांत भागवत

उमरखेड, : विदर्भ–मराठवाड्याच्या सीमेवरील निसर्गाचा अद्भुत आविष्कार म्हणून प्रसिद्ध असलेला सहस्रकुंड धबधबा अखेर प्रवाहित झाला आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले होते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांनी गजबजणारा सहस्रकुंड यंदा ओसाड आणि निस्तेज दिसत होता. मात्र जुलैच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसानंतर पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली असून, काळ्या कातळांवरून कोसळणाऱ्या शुभ्र फेसाळ जलधारांनी सहस्रकुंड पुन्हा एकदा जिवंत झाला आहे.

हिरव्यागार वनराईच्या सान्निध्यात काळ्याभोर कातळांमधून कोसळणाऱ्या असंख्य जलधारांचे दृश्य पाहताना जणू निसर्गाने हजारो नेत्र उघडून पृथ्वीवर जलाभिषेक सुरू केल्याचा भास होतो. याच वैशिष्ट्यामुळे या धबधब्याला 'सहस्रकुंड' हे नाव प्राप्त झाले आहे. पाण्याची प्रचंड गर्जना, उडणारे शुभ्र तुषार, दरीत घुमणारा नाद आणि धुक्याने वेढलेला परिसर पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करत आहे.

यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे पर्यटनप्रेमींना सहस्रकुंड प्रवाहित होण्याची आतुरता लागली होती. अखेर धबधबा सुरू झाल्याची माहिती मिळताच उमरखेड, पुसद, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी तसेच तेलंगणातील विविध भागांतून पर्यटकांची पावले सहस्रकुंडकडे वळू लागली आहेत. अनेक पर्यटक या नयनरम्य दृश्याचे छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरण करून अविस्मरणीय आठवणी जतन करत आहेत.

महाराष्ट्र–तेलंगणा सीमेवरील पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड हा विदर्भातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक मानला जातो. पावसाळ्यात येथे जलप्रवाह अधिक वेगवान आणि धोकादायक स्वरूप धारण करत असल्याने प्रशासनाकडून पर्यटकांना सुरक्षित अंतर राखण्याचे, सेल्फीच्या मोहापायी धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सध्या हिरवाईने नटलेला परिसर, काळ्या कातळांवरून कोसळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र जलधारा आणि धुक्याची चादर यांचा अप्रतिम संगम अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा प्रवाहित झालेल्या सहस्रकुंडामुळे निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, "सहस्रकुंड पुन्हा जिवंत झाला!" अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आणि ओठांवर उमटताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT