

March by Alandi villagers to the Biloli Tehsil office
बिलोली, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील आळंदी येथील शासकीय गायरान जमीनीवर होत असलेल्या कथित अतिक्रमण व अवैध उत्खननाविरोधात ग्रामस्थांनी सोमवार दि. २७ जुलै रोजी बिलोली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात महिला, शेतकरी, पशुपालक व ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.
ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, गट क्रमांक १२० ही शासनाची गायरान जमीन असून, ई-टीएस मोजणीनंतरही काही व्यक्तींकडून वारंवार अतिक्रमण करून अवैध उत्खनन सुरू असल्याचा आरोप केला. या प्रकरणात संबंधितांवर महाराष्ट्र महसूल अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करावी, गायरान क्षेत्राचे संरक्षण करावे तसेच भविष्यात अतिक्रमण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर विश्वास व्यक्त करत आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास १५ ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला.
मोर्चात परमेश्वर अटकळे, बाळासाहेब चट्टे, उज्वल चट्टे, नामदेव चिंदमलवार, संतोष जुकरे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलनानंतर तहसीलदार गजानन शिंदे यांनी ग्रामस्थांना लेखी उत्तर दिले. त्यामध्ये गायरान जमिनीवरील अतिक्रमण व अवैध उत्खननाबाबत त्वरित चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार महसूल अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, तसेच गायरान जमिनीच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना व संरक्षित भिंत उभारण्याबाबत ग्रामपंचायतीस कळविण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.