Nanded Power supply is off; the crops have withered
मुखेड, पुढारी वृतसेवा: खरीप हंगामात अतिवृष्ठीमुळे पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ते नुकसान भरुन काढण्यासाठी रब्बी हंगामात शैतकऱ्यांनी हरबरा, गहु, ज्वारी आदी पिकांच्या पेरण्या केल्या. पण कृषीपंपांना विद्युत पुरवठा करणारे रोहीत्र मागील दोन महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने पिके सुकुन जात आहेत.
ही पिके हातची गेली तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवुन नवीन रोहीत्र तातडीने बसवावे अशी मागणी सलगरा खु. चे माजी सरपंच अविनाश देशमुख, माजी सरपंच प्रल्हाद डांगे यांनी केली आहे.
तालुक्यातील सलगरा खु. येथील रोहीत्र अतिवृष्ठीच्या काळात नादुरुस्त झाले होते. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामापुर्वी नविन रोहीत्र देण्याची मागणी केली होती. दोन महिन्यांपासून यासाठी महावितरण कार्यालयात शेतकरी चकरा मारत आहेत. पण त्यांना केवळ आश्वासना शिवाय काहीच मिळत नाही.
मन्याड नदीला पाणी मुबलक असताना केवळ रोहीत्र अभावी पिकाना पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांची उभी पिके सुकुन जात आहेत. ही पिके हातची गेली तर शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. विषेश म्हणजे या गावच्या शेजारी असलेल्या नंदगाव (प.क.) ला तातडीने रोहीत्र उपलब्ध करुन देण्यात आले. मग सलगरच्या ग्रामस्थांसाठीहा दुजाभाव का? वशिला चिरीमिरी देणाऱ्यांना तातडीने रोहीत्र उपलब्ध करुन दिली जात असल्याचे समजते.
शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभा असल्याची घोषणा केली जाते. पण प्रत्यक्षात शेतकरी मात्र दूर्लक्षीत असुन, कृषी पंपांचे रोहीत्र बंद पडल्यास १५ दिवसांत बदलुन देण्याची हमी शासनाने दिली असताना दोन महिन्यांपासून रोहीत्र मिळत नाही याबाबत शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
रोहीत्र अभावी कृषीपंपांना पाणी पुरवठा होत नसल्यास शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी महावितरणने घेवुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रब्बी पिकांना जीवदान देण्यासाठी सलगरा खु. येथील रोहीत्र बदलुन मिळावे, अशी मागणी माजी सरपंच अविनाश देशमुख आणि माजी सरपंच प्रल्हाद डांगे यांनी महावितरण कंपनीकडे केली आहे.