

Nanded police take action against sand smugglers.
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: दिवसरात्र वाळूची अवैधरित्या होणारी तस्करी यातून होणारे अपघात व शासनाचे नुकसान यामुळे नांदेड पोलिस अॅक्शन मोड मध्ये आली, आहे. शुक्रवार (दि. २६) रोजी नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीच्या पात्रातील गंगाबेट व मुदखेड पोलिसांनी ब्राम्हणवाडा येथील नदीपात्रातून वाळूची अवैधरित्या उपसा करुन तस्करी करणा-या वाळूसह, पोकलेन, दोन टिप्पर, ८ तराफे असा २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केली आहे. या कारवाई मुळे वाळू माफियांचे अक्षरशः धाबे दणाणले आहेत.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नांदेड शहरापासून जवळच असलेल्या गंगनबेट येथील गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आमकांत चिंचोलकर व पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड यांच्या पथकाने अचानक नदीपात्रात छापा टाकून २५ हजार रुपये किंमतीची पाच ब्रास वाळू जप्त केली, तसेच चार लाख रुपये किंमतीचे आठ तराफे जप्त करुन जाळून जागीच नष्ट केले.
तसेच तीन लाखांचे एक इंजिन जप्त केले. या प्रकरणात ग्रामीण पोलिस ठाण्यात वाळू तस्करी करणारे रामचंद्र वानखेडे, संदिप वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तर मुदखेड येथील ब्राम्हणवाडा येथे मुदखेड येथील पोलिस निरीक्षक धिरज चव्हाण यांच्या पथकाने नदीपात्रात विनापरवाना अवैधरित्या वाळूचा उपसा करणे व वाहतूक करणा-या दहा लाखाची पोकलेन, एक टिप्पर व १५ हजार रुपये किंमतीची वाळू जप्त केली. तसेच मुदखेड पोलिस ठाण्यात विठ्ठल जळबाजी दुधमल व देवानंद विठ्ठल दुधमल विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी नांदेड व मुदखेड या दोन ठिकाणी वेगवेगळी कारवाई करत एकुण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला तसेच चार जणांविरोधात गुन्हा दाखल करत वाळू तस्करांना मोठा धक्का दिला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरे अशन फ्लॅश आऊट अंतर्गत वाळू तस्करांविरोधात उघडल्या मोहिमेमुळे वाळू तस्करांचे व त्यांना पाठींबा देणा-यांचे चांगलेच धावेदणाणले आहेत.
मोहीम अधिक तीव्र हवी...
गोदावरी नदीतील विविध ठिकाणाहून होणारा वाळूचा उपसा हा पर्यावरणाचा -हास करणारा ठरत आहेत. शिवाय यातून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे. तसेच दिवसरात्र हायवा व ट्रकने वाळूच्या वाहतूक करणा-या वाहनांचे अपघातही वाढले आहेत. त्यामुळे महसुल व पोलिस प्रशासनाने वाळू तस्करां विरोधात मोहिम तिव्र करुन वाळू तस्करांचे समुळ उच्चाटन करण्याची मागणी जोर धरत आहे.