Nanded  file photo
नांदेड

Nanded | हुजरेगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वेणुगोपाल राव यांनी फटकारले!

काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी कोणाचीही शिफारस चालणार नाही

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : कॉंग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व तालुकाध्यपदांसाठी अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव वेणुगोपाल राव यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष निरीक्षकांनी सुरू केलेली निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात येत असतानाच जिल्हाध्यक्षपदासाठी आपल्या मर्जीतील किंवा आपल्याच नावाची शिफारस व्हावी, यासाठी चापलुसी व हुजरेगिरी करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांना वेणुगोपाल राव यांनी चांगलेच फटकारल्याची माहिती समोर आली आहे. कोणाच्याही शिफारशीवर जिल्हाध्यक्षपद मिळणार नाही, पक्षश्रेष्ठींकडे ज्या नावाची शिफारस जाईल, तेच नाव निश्चित होईल, असे राव यांनी या पदाधिकाऱ्यांना ठणकावल्याचे समजले.

संघटन सृजन अभियानांतर्गत अखिल भारतीय काँग्रेसच्यावतीने संघटनेत फेरबदल केले जाणार असून त्यासाठी १० एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात इच्छुकांच्या मुलाखती वपदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. पक्षाचे महासचिव वेणुगोपाल राव, सचिव रवींद्र दळवी, पक्षनिरीक्षक अशोक पाटील निलंगेकर आदी नांदेडमध्ये मुक्कामी आहेत. या निवड समितीने नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठी या विभागातील विधानसभा क्षेत्राचा दौरा केला आहे. याशिवाय नांदेड शहराध्यक्षपदासाठीही काहींच्या मुलाखती व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

दोन दिवसांपूर्वी काही इच्छुक उमेदवारांनी

आपल्या विश्वासातील पदाधिकाऱ्यांना वेणुगोपाल राव यांच्याकडे त्यांची 'खास' व्यवस्था करण्यासाठी पाठविले असता चमकोगिरी करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांची राव यांनी चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते. आपण कोणत्याही एका नावाची शिफारस खपवून घेणार नाही, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर प्रतिष्ठित व्यक्तिशी चर्चा करूनच पक्षश्रेष्ठींकडे अहवाल पाठविणार आहोत. जिल्हाध्यक्षपदाचा उमेदवार दिल्लीतच निश्चितच केला जाईल, असे राव यांनी ठणकावून सांगितल्याची माहिती आहे.

शहराध्यक्ष अब्दुल सत्तार हटाव मोहीम सुरूच असून त्यांच्याविरुद्ध ४० जणांच्या स्वाक्षरीने निवड समितीकडे तक्रार दिली आहे. सत्तार यांच्यासह बेटमोगरेकर यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचे राजीनामे का दिले नाहीत? अशी विचारणा काही संतप्त पदाधिकाऱ्यांनी केल्याचे समजले. शहराध्यक्षपदासाठी अजूनही सत्तार इच्छुक असून त्यांच्यासह महेश देशमुख, बालाजी चव्हाण, शफी अहमद कुरेशी, अॅड. म.अ. रहेमान सिद्दीकी यांच्या नावांची चर्चा आहे.

नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठीची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या निवड समितीच्या शेवटच्या दौऱ्यात देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा होणार आहे. नांदेड दक्षिणसाठी पुन्हा हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, डॉ. भगवान मनूरकर, रामदास पाटील सुमठाणकर, संजय पाटील शेळगावकर यांच्यासह अन्य काही जण इच्छुक आहेत. तर नांदेड उत्तरमध्ये राजेश पावडे, प्रा. संदीपकुमार देशमुख, रेखा चव्हाण, विठ्ठल पावडे इच्छुक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT