

हदगाव : तालुक्यातील जवळपास सर्वच ग्राम महसुल अधिकारी यांचा तालुक्यावरुनच कारभार हाकत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची परवड होत आहे. विविध कागदपत्रे काढण्यासाठी त्यांना थेट हदगावला यावे लागत आहे. अशा या ग्राम महसुल अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.हदगाव तालुक्यात एकूण ४७ ग्राम महसुल अधिकारी सज्जे असून, तालुक्यात आठ मंडळ अधिकारी कार्यालये आहेत. १२५ गावांचा कारभार पाहण्यासाठी ४७ तलाठी आहेत. ग्राममहसुल अधिकार्यावर संपूर्ण तालुक्याचा कारभार चालतो.
शासनाने ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी यांचे हाल व नुकसान टाळण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन ग्राम महसुल अधिकारी सज्जे उभे केले. सोयी-सुविधायुक्त कार्यालये बांधण्यात आली. काही दोन-चार तलाठी सोडले तर बाकीचे ग्राम महसुल अधिकारी मात्र कार्यालयात बसून कारभार पाहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील बर्याच वर्षांपासून तालुक्यातील सर्वच ग्राम महसुल अधिकारी हदगावतूनच सज्जांचा कारभार हाकतात. त्यामुळे वयवृद्ध नागरिक, शेतकरी राजा, तसेच विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांसाठी लागणारी स्वाक्षरी व कागदपत्रे घेण्यासाठी हदगाव शहरात यावे लागते. विशेष म्हणजे येथे आल्यानंतरही या ग्राममहसुल अधिकार्यांच्या मनमानी कारभाराला त्यांना सामोरे जावे लागते. वयोवृद्ध नागरिक, विधवा महीला, विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन कागदपत्रे देण्याचा कारभारही हे ग्राम महसुल अधिकारी करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.
तालुक्यातील ४७ सज्जापैकी मोचके ग्राम महसुल अधिकारी सोडले तर बाकीचे ग्राम महसुल अधिकारी ही सज्जावर हजर नसतात.सज्जावरच्या कार्यालयात न राहता हे तलाठी किरायाच्या खोल्यांमध्ये हदगाव शहरात तर कोणी जिल्यावर राहतात. सध्या शासनाच्या विविध योजनेचा लाभ असो किंवा शाळेकरी विद्यार्थी त्यांच्यासाठी प्रक्रिया जात प्रमाणपत्र. रहिवाशी,कुटुंब मर्यादा प्रमाणपत्र,निराधार योजना,वयवृद्ध महीला,अपंग योजना आदी प्रमाणपत्र महत्वाची ठरत आहेत. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी ग्राम महसुल अधिकारी महाशहाची सकाळपासुनच गावात मिळत नसेल तर तालुक्यात शोध घेत असतात. आज इथे तर उद्या तिथे अशाप्रकारे हे ग्राम महसुल अधिकारी हे किरायाच्या खोल्या बदलत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा व विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. ज्याठिकाणी कार्यालये उभारण्यात आलेली आहेत. त्याठिकाणी हे ग्राम महसुल अधिकारी हजर रहात नसल्याने ही कार्यालये शोभेची वस्तू बनू लागले आहेत.अपंग व्यक्ती, विद्यार्थी, शेतकरी, जेष्ठ नागरिक, विधवा महीला यांना गावातच कागदपत्रे उपलब्ध करुन द्यावीत व त्यांचे होणारे हाल थांबवावेत,अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
याबाबत तहसीलदार सय्यद उमर यांना आमच्या प्रतिनिधीने विचारणा केली असता ते म्हणाले की, ग्राम महसुल अधिकार्यांना मुख्यालयी राहण्याबाबत लेखी सूचना दिल्या आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्या ग्राम महसुल अधिकार्यावर करडी नजर ठेवून कारवाई केली जाईल.ग्राम महसुल अधिकारी यांच्याकडुन सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, अपंग, वयवृद्ध नागरिक, विधवा महीलेसह यांचे हाल होऊ नयेत, याची काळजी घेऊ असल्याचे तहसिहदार यांनी म्हटले आहे.