नांदेड : शहरात अवैध अंमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या विशेष मोहिमेंतर्गत, जय भवानी चौक परिसरातून तब्बल २ लाख ३५ हजार ५०० रुपये किमतीचा ४ किलो ७१० ग्रॅम ओला गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात दोन आरोपींना रंगेहाथ अटक करून एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
२४ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विनोद देशमुख गस्त घालत होते. २५ ऑक्टोबर रोजी पहाटे स्ट्रीट सेफ्टी पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक नृसिंह पोमनाळकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन संशयित इसम बेकायदेशीररीत्या गांजाच्या झाडाच्या फांद्यांची मोळी विक्रीसाठी घेऊन जात आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने व पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त सापळा रचण्यात आला.
पंचांसमक्ष फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तपासणी करून मुद्देमाल गांजा असल्याचे निश्चित केले. आरोपी तुकाराम पावडे (वय ५०, रा. वाडी बु.) आणि रुक्मण वायवळे (वय ५१, रा. इंदिरानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पावडे याने स्वतःच्या प्लॉटिंगमधील गांजा आर्थिक फायद्यासाठी तोडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुद्देमालाला सीलबंद केले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.