Beed Drought : 'बैलजोडीला बाळसं राहणार नाही, आबाळ होईल'

Maharashtra Farmers Crisis : पशुधन विकताना बीडमधील शेतकर्‍यांचे डोळे पाणावले; पशुधनाच्या किमतीत घट
Beed Drought
बैलजोडीpudhari photo
Published on: 
Updated on: 

उदय नागरगोजे

बीड : 'बाळसं राहणार नाही, आबाळ होईल... विकायसारखी जनावरं नाहीत ही; पण पाण्याअभावी विकायची वेळ आली...' या शब्दांत शिरपुरा येथील शेतकरी राजेश घुले यांनी आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या बैलजोडीची व्यथा मांडली. गतवर्षी दीड लाख रुपये मोजून खरेदी केलेली बैलजोडी आज सत्तर ते ऐंशी हजार रुपयांत विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. जनावरांचे संगोपन करण्याची इच्छा असूनही पाणी आणि चार्‍याअभावी हतबल झालेल्या शेतकर्‍यांच्या वेदना केज तालुक्यातील साळेगावच्या बाजारात दिसून येत आहेत.

बीड जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतकर्‍यांसमोर संकटांची मालिका उभी राहिली आहे. पिके करपली, रब्बीच्या पेरण्या रखडल्या आणि पिण्याच्या पाण्यासाठीही धावाधाव करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना आता दावणीला बांधलेले पशुधन सांभाळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे जीवापाड जपलेली बैलजोडी, गायी आणि म्हशी विक्रीसाठी बाजारात आणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र, बाजारात खरेदीदारांची संख्या कमी असल्याने आणि जनावरांचे भाव जवळपास निम्म्यावर आल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

Beed Drought
Medicine sample Testing: सरकारी रुग्णालयांतील औषधांवर आता AI ची नजर! अवघ्या २ मिनिटांत प्राथमिक तपासणी

साळेगावचे सरपंच कैलास पाटील यांनीही या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. दहा-पंधरा एकर शेती असलेले शेतकरीही आपल्या बैलजोडीचे चांगले संगोपन करतात. मात्र, आता अशा शेतकर्‍यांनाही जनावरे विक्रीसाठी आणावी लागत आहेत. जनावरे विकताना शेतकर्‍यांना अश्रू अनावर होतात; परंतु चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरत नाही. दुष्काळामुळे जनावरांचे बाजारभावही जवळपास पन्नास टक्क्यांनी घसरल्याचे पाटील यांनी सांगितले.

सातेफळ येथून बाजारात आलेल्या दिगांबर जगताप यांनीही आपली व्यथा मांडली. सोयाबीनचे पीक जळून गेले असून रब्बीची पेरणीही करता आलेली नाही. त्यांच्याकडे चार-पाच जनावरे आहेत. जनावरांचे भाव जाणून घेण्यासाठी ते बाजारात आले; मात्र खरेदीदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. जनावरांना खायला कडबा नसल्याने त्यांचे संगोपन करणे कठीण झाले आहे. सरकारने संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Beed Drought
Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर १ नोव्हेंबरपासून मालवाहू वाहनांना बंदी

सरकार दप्तरी चारा उपलब्ध असल्याची नोंद!

दुष्काळाच्या काळात शेतकर्‍यांच्या मदतीसाठी चारा उपलब्ध असल्याच्या सरकारी नोंदी असल्या, तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. आजच चारा मिळत नसल्याने शेतकरी पशुधनाला बाजारचा रस्ता दाखवत आहेत. भविष्यात जनावरांच्या चार्‍याची आणि पाण्याची व्यवस्था कशी करायची, याचे उत्तर शेतकर्‍यांना मिळत नसल्याने ते पशुधन विकण्याचा कठोर निर्णय घेत आहेत. शेतीच्या कामात वर्षानुवर्षे साथ देणारी बैलजोडी विकताना शेतकर्‍यांचे डोळे पाणावत आहेत. दुष्काळाने केवळ पिकेच हिरावून घेतली नाहीत, तर शेतकर्‍यांच्या जगण्याचा आधार असलेल्या पशुधनावरही संकट आणले आहे.

माणसालाच पाणी मिळेना, तर जनावरांचे कसे?

शिरपुरा येथील शेतकरी राजेश घुले यांनी गतवर्षी दीड लाख रुपये खर्चून बैलजोडी खरेदी केली होती. चांगल्या पद्धतीने संगोपन करून त्यांनी जनावरांची बडदास्त ठेवली. मात्र, यंदाच्या दुष्काळात पाणी आणि चार्‍याची उपलब्धता नसल्याने त्यांना बैलजोडी विक्रीसाठी साळेगावच्या बाजारात आणावी झाली. बाजारात कोणी ७० हजार, तर कोणी ८० हजार रुपये देण्याची तयारी दाखवत असल्याचे त्यांनी सांगितले. माणसालाच पाणी मिळणे कठीण झाले आहे, तर जनावरांचे कसे, असा सवाल करत सरकारने मदतीसाठी विलंब न करता तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news