नांदेड : गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या आपल्याच भाऊजीचा मेव्हण्यांनी धारदार शस्त्रांनी खून केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. बळीरामपूर जवळील जंगलात ही थरारक घटना शनिवारी घडली. मात्र, नांदेड ग्रामीण पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय साहेबराव शिंदे (वय ३५, रा. मित्रनगर, बळीरामपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी रात्री विजय शिंदे याने आपले मेव्हणे साहेबराव बाबू वाघमारे (वय २४) आणि विशाल अनिल जाधव (वय २५) यांच्यासोबत इतवारा भागात दारू पार्टी केली. त्यानंतर मटणावर ताव मारून हे तिघेही फिरत फिरत बळीरामपूरजवळील एका ओसाड जंगल परिसरात पोहोचले. तिथे आधीच रचलेल्या कटानुसार दोन्ही मेव्हण्यांनी विजयवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. या हल्ल्यात विजयचा जागीच मृत्यू झाला.
मयत विजय शिंदे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात बलात्कारासह चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल होते. तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. दरम्यान, त्याला ठार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा मात्र कोणताही जुना गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. कौटुंबिक वाद किंवा अन्य कारणांतून हा कट रचला गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात रविवारी वृत्तलिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
असा लागला गुन्ह्याचा छडा
घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांची माहिती काढली आणि काही तासांतच साहेबराव वाघमारे व विशाल जाधव यांना बेड्या ठोकल्या आहेत.