

नांदेड : जुन्या वैमनस्यातून उफाळलेल्या रक्तरंजित गँगवॉरने शुक्रवारी रात्री उशिरा नांदेड शहर हादरले. या संघर्षात 3 जणांची निर्घृण हत्या झाली असून, त्यातील एकाला फिल्मी स्टाईलने थेट रुग्णालयात घुसून ठार मारण्यात आले. यात एका टोळीचा म्होरक्या आणि शिवसैनिक अरिजितसिंग गजानन चव्हाण (25, रा. बालाजीनगर, नांदेड) आणि दुसर्या टोळीतील सय्यद आवेज सय्यद खलील (27) व मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (23, रा. देगलूर नाका, नांदेड) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
अरिजितसिंग चव्हाण याने उबाठाच्या तिकिटावर नांदेड महापालिकेची निवडणूक लढवली होती. नांदेड शहरातील साईलीला आणि सदा टोळीत गेल्या अनेक महिन्यांपासून वर्चस्वाची लढाई सुरू आहे. या दोन्ही टोळ्यांमध्ये यापूर्वीही अनेकवेळा संघर्ष झालेला आहे. दरम्यान, सदा टोळीचा अरिजितसिंग चव्हाण हा शुक्रवारी रात्री ई-स्क्वेअर परिसरात दोन साथीदारांसह धुरंधर हा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. रात्री दीड वाजता चित्रपट संपल्यानंतर तो साथीदारांसह घराकडे निघताच आधीपासून तिथेच दबा धरून बसलेले आरोपी आवेज आणि अरबाजने अरिजितसिंगला अडविले आणि अचानक त्याच्यावर खंजिराने हल्ला चढविला. काही क्षणातच अरिजितसिंग रक्ताच्या थारोळ्यात पडला, त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी अरिजितच्या साथीदारांनीही धारदार शस्त्राने आवेज आणि अरबाजवर सपासप वार केले. त्यात अरबाज जागीच ठार झाला तर आवेज गंभीर जखमी झाला. हा प्रकार पोलिसांना कळताच ते घटनास्थळी पोहोचले. आसपासचे नागरिक आणि पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांनाही उचलून शासकीय रुग्णालयात नेले.
अरिजितसिंगवर हल्ला झाल्याचे कळताच त्याचा भाऊ राजेश चव्हाण हा टोळीतील काही साथीदारांना घेऊन सशस्त्र रुग्णालयात घुसला. आपल्या भावाच्या मृत्यूच्या सुडाने पेटलेल्या राजेशने बाजूच्याच बेडवर उपचारासाठी ठेवलेल्या आवेजवर रुग्णालयातच सपासप वार केले. या हल्ल्यात आवेजचाही मृत्यू झाला. या हत्याकांडाने रुग्णालयात एकच खळबळ उडाली.
पाच गुंडांना अटक; 20 जणांवर गुन्हे
मृत अरिजितसिंगच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शनिवारी दुपारी 10 गुंडांवर खुनाचा गुन्हा दाखल केला तर सय्यद आवेज याच्या वडिलांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसात 10 गुंडांवर गुन्हा दाखल केला. दोन्ही टोळ्यांतील 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली. पोलिसांनी आतापर्यंत पाचजणांना ताब्यात घेतले आहे.