नांदेड ः एकाने मी पुण्यातील मारणे गँगचा सदस्य आहे. नांदेड मध्ये 6 मार्च रोजी एका धार्मिक स्थळावर बॉम्ब पडणार आहे अशा आशायाची चिठ्ठी लिहून नांदेडच्या बसस्थानकाच्या तक्रार पेटीत टाकली आणि या बाबतचे कॉल जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला देखील केला. नांदेड पोलीसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत या प्रकरणाचा छडा लावत चिठ्ठी लिहून , फोन लावणाऱ्या माथेफिरुला अत्यंत शिताफिने अटक केली आहे.
या बाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात एक निनावी फोन आला की नांदेड शहरात 6 मार्च रोजी एका धार्मिक स्थळावर बॉम्ब पडणार आहे. त्यासंदर्भातील चिठ्ठी नांदेडच्या बसस्थानकाच्या तक्रार पेटीत टाकली असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलीसांनी तातडीने दखल घेत. तक्रारपेटी तपासली असता. तक्रार पेटीत चिठ्ठी सापडली.त्या चिठ्ठीत मी पुण्यातील मारणे यांच्या गँगचा सदस्य आहे. आणि नांदेडमध्ये 6 मार्च रोजी दिपक बालासाहेब मारणे हा बॉम्ब टाकणार आहे असे चिठ्ठीत नमुद केले.
त्यामुळे तातडीने सायबर टिमच्या मदतीने पोलीसांनी शोध घेऊन अंबेजोगाई येथील मनियार गल्ली येथून शेख सलीम शेख चाँद पाशा वय 35 याला अटक केली. त्याने आपणच चिठ्ठी लिहीली व फोनही केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने मी पुण्यात एका दिपक बालासाहेब मारणे यांच्या हॉटेलमध्ये नोकरी करत होतो त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात शस्त्र साठा आहे. तेच बॉम्बस्फोट करणार आहेत म्हणून ही माहिती टाकल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, त्याच्या एकंदर वागणूकीवरुन तो माथेफिरु असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
शेख सलीम याने यापुर्वीही मी दिल्ली,मुंबई व छत्रपती संभाजीनगर येथे असेच सांगितले होते असे सांगत असून,शेख सलीमने छत्रपती संभाजीनगर येथे असाच प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. शेख सलीम विरोधात अंबेजेोगाई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो माथेफिरु असल्याची बाब पुढे आली असून, तो अंबेजोगाई येथे पाणीपुरीचा व्यवसाय करतो. अशी माहिती ही पोलीसांनी सांगितली.
दरम्यान, या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम य्ांच्या टिमने सायबरटिमच्या मदतीने शेख सलीमला अटक करुन शेख सलीमने टाकलेल्या लेटर बाँम्बमध्ये कांहीही तथ्य नसल्याची बाब सुमोर आणली आहे.
या प्रकरणात शेख सलीम विरोधात पोलीस जमादार बालाजी नागमवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरवले हे करीत आहेत.
माझ्या डोक्यात चिप बसविली
नांदेड, संभाजीनगर, दिल्ली व मुंबई येथे लेटर बाँम्ब टाकून तुमच्या शहरात बॉम्ब पडणार आहे. अशी अफवा पसरवून सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या शेख सलीम यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शेख सलीम याने मारणे याने माझ्या डोक्यात चिप बसविली आहे आणि मी काय करतो कुठे जातो याची त्याला माहिती मिळते असेही पोलिसांना सांगितले आहे. प्राथमिकस्तरावर हे प्रकरण गांभीर्याचे दिसत नसले तरी या प्रकरणाचा वजिराबाद पोलीस करणार आहेत तपासात सत्य काय ते पुढे येईल.