किनवट : स्थानिक गुन्हे शाखेने किनवट तालुक्यातील पेंदा येथे छापा टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूचा १ लाख ६ हजार १४९ रुपयांचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मधुकर सोनकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नूर मोहम्मद ऊर्फ बबलू शेख करीम (रा. पेंदा, ता. किनवट) व अशोक ठाकूर (रा. इचोडा, जि. आदिलाबाद, तेलंगणा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ जून रोजी सायंकाळी सुमारे ६.२० वाजता पेंदा येथील आरोपीच्या घराच्या अंगणात झाडाखाली हा प्रतिबंधित साठा आढळून आला. कारवाई दरम्यान गोवा-१०००, जी-वन, आर.के. प्रिमियम, सागर प्रिमियम, प्रिमियम राज निवास, के.एम.-१, एसआर-१, विमल, व्ही-१, मुसाफिर, एम-४, अंबर व अनार या विविध ब्रँडच्या गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू व जर्द्याची एकूण ३१ पोती तसेच प्लास्टिकची फारी असा एकूण १ लाख ६ हजार १४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून कर्करोगासारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या या प्रतिबंधित अन्नपदार्थांचा विक्रीसाठी साठा करून महाराष्ट्र शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप असून, या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक नितेश लेनगुळे हे पुढील तपास करीत आहेत.