

वाशिम : वाशिम जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि उत्पादनांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे. विविध ठिकाणी केलेल्या धाडींमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट करण्यात आला आहे. या कारवायांनी अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ जून २०२६ रोजी मोहगव्हाण (ता. अनसिंग) येथील धरणाच्या काठावर छापा टाकला. पोलिसांची चाहुल लागताच आरोपी पसार झाले. मात्र, परिसरात केलेल्या पाहणीत झाडाझुडपात आणि जमिनीत पुरून ठेवलेले मोहाचे सडके रसायन (५,४०० लिटर) आणि गावठी दारू (३० लिटर) असा एकूण ५ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी आमिर मोहम्मद नौरंगाबादी (रा. मोहगव्हाण) याच्यावर अनसिंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त केलेला माल पंचांसमक्ष नष्ट करण्यात आला.
तसेच, मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्ली येथे अमर दादाराव राऊत यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५८,५०० रुपयांचा मुद्देमाल (मोहाचे रसायन व गावठी दारू) जप्त करण्यात आला. याप्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेने एकूण ६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अवैध दारू विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी (मंगरुळपीर) विशाल क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बांगर, पोलीस उपनिरीक्षक शेखर मास्कर आणि त्यांच्या पथकाने केली.