Palash flowers blooming  Pudhari
नांदेड

Flame of the Forest | अग्नीवृक्षाचा ज्वालामय बहर : होळीच्या चाहुलीत रानात फुलला पळस

जणू आकाशातील अग्निशिखाच जमिनीवर उतरल्या आहेत, असा भास होतो. म्हणूनच पळसाला अनेक कवींनी “अग्नीवृक्ष” अशी उपमा दिली आहे

पुढारी वृत्तसेवा

Palash flowers blooming

प्रशांत भागवत

उमरखेडः होळीच्या आगमनाची चाहूल लागताच रानावनात एक वेगळाच ज्वालामय सोहळा पेटतो!, तो म्हणजे पळसफुलांचा बहर. पानगळ झालेल्या झाडांवर अचानक उमललेली केशरी-तांबडी फुले पाहिली की, जणू आकाशातील अग्निशिखाच जमिनीवर उतरल्या आहेत, असा भास होतो. म्हणूनच पळसाला अनेक कवींनी “अग्नीवृक्ष” अशी उपमा दिली आहे.

पळसाचे शास्त्रीय नाव Butea monosperma. ग्रामीण भागात त्याला “टेसू”, “ढाक”, “किंजळ” अशा विविध नावांनी ओळखले जाते. फांद्यांवर पाने नसतानाच फुलांचा अग्नीमय साज चढवलेला पळस निसर्गाच्या रंगोत्सवाची सुरुवात करतो. होळी जवळ आली की या फुलांचा रंग पाण्यात भिजवून नैसर्गिक रंग तयार करण्याची परंपरा होती. त्वचेला अपाय न करणारा हा रंग आरोग्यदायी मानला जातो. त्यामुळे पळस आणि होळी यांचे नाते अतूट मानले जाते.

ज्येष्ठ आरण्यऋषी दिवंगत मारुती चित्तमपल्ली यांनी त्यांच्या 'जंगलाचं देणं', या पुस्तकात पळसाचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, पळस फुलला की रान उजळून निघते; जणू निसर्गाने स्वतःच्या हाताने होळी पेटवली आहे. पानगळ झालेल्या फांद्यांवर उमललेली ही फुले म्हणजे निसर्गाच्या आशावादाचे प्रतीक — ओसाड वाटणाऱ्या वृक्षालाही पुन्हा बहर येतो, हे त्यातून शिकवण मिळते.

पळसाच्या फुलांचा आकार पोपटाच्या चोचीसारखा भासतो. मधुरसाने परिपूर्ण असलेल्या या फुलांकडे मधमाश्या, फुलपाखरे आणि विविध पक्षी आकर्षित होतात. त्यामुळे पळस हा केवळ शोभेचा वृक्ष नसून जैवविविधतेचा आधारस्तंभ ठरतो. त्याच्या लाकडाचा, पानांचा आणि गोंदाचाही ग्रामीण जीवनात उपयोग होतो. पानांच्या पत्रावळ्या, तर गोंद औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे.

मराठी साहित्यातही पळसाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. कवींच्या लेखणीतून तो विरह, उत्कटता आणि नवचैतन्य यांचे प्रतीक बनून उतरतो. केशरी ज्वाळांनी नटलेले झाड पाहताना मनात एकाच वेळी सौंदर्याची मोहिनी आणि ऊर्जेची लहर जागी होते. म्हणूनच पळसफुले ही केवळ फुले नसून ती ऋतू परिवर्तनाची घोषणा असते.

आज रस्त्याकडेला, शेतमाळावर, डोंगरकड्यांवर पळसाचा हा अग्निमय बहर सर्वत्र दिमाखात उभा आहे. उन्हाळ्याच्या चाहुलीबरोबर निसर्गाने सजवलेली ही केशरी आरास प्रत्येकाच्या मनात रंगोत्सवाची उब निर्माण करते.

होळीच्या रंगांत मिसळणारा पळस जणू सांगतो —

“जुने गळून पडू दे, नव्या फुलांनी जीवन उजळू दे!”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT