

देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने होळीचा उत्सव साजरा केला जातो. राग आणि रंग यांचा या उत्सवाशी एवढे घनिष्ठ संबंध आहे की, याला आदिपर्व म्हटले जाते. परंपरा, उत्सव आणि संस्कृती यांचा अनोखा संगम म्हणजे भारतीय होळी. लोक आपली दुःखे विसरून होळीचा रंग धारण करून आनंदात नाचतात आणि आपली सांस्कृतिक ओळख जगाला सांगतात. आपले हे सांस्कृतिक वैभव आज जगभरात पोहोचले आहे.
फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाणारी होळी, श्रावण पौर्णिमेची श्रावणी, आश्विन शुक्ल दशमीला केली जाणारी शक्तिपूजा आणि विजयादशमीव्यतिरिक्त आश्विन अमावस्येला साजरी होणारी दिवाळी हे भारतीय समाजाचे चार महत्त्वाचे सण आहेत. इतिहास आणि संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळापासून ते साजरे केले जात आहेत. काळ बदलला, जग बदलले, जीवनशैली बदलली, आहार-विहार बदलले, विचार बदलले तरीही वर्षानुवर्षे हे सण भारतीय समाज तितक्याच उत्साहाने साजरे करत आला आहे. या चार सणांना अतिप्राचीन आणि प्राणवान असे म्हटले जाते. ज्यात ऊर्जा आणि संदेश आहे, असे सण म्हणजे प्राणवान होत. श्रावणीची प्रेरणा विद्या, विजयादशमीची प्रेरणा शक्ती, दीपावलीची समृद्धी आणि होळीची प्रेरणा उल्हास आणि समरसता असल्याचे म्हटले गेले आहे. राग आणि रंग यांचा या उत्सवाशी एवढा घनिष्ठ संबंध आहे की, याला आदिपर्व म्हटले जाते. परंपरा, उत्सव, आणि संस्कृती यांचा अनोखा संगम म्हणजे भारतीय होळी. जैमिनीच्या पूर्वमीमांसा सूत्रात आणि कथाग्राह्य सूत्रात होलिकेचा उल्लेख आढळतो.
भारतात सर्वांत प्रसिद्ध आणि जुनी कहाणी प्रल्हादाची आहे. असे म्हणतात की, अतिप्राचीन काळात हिरण्यकश्यपू नावाचा असुर होता. तो स्वतःला ईश्वर मानू लागला होता. आपल्याखेरीज इतरांना ईश्वर म्हणण्यावर त्याने बंदी घातली होती. त्याचा पुत्र प्रल्हाद हा ईश्वरभक्त होता. आपला मुलगा विष्णू नावाच्या देवाची आराधना करतो, हे हिरण्यकश्यपूला समजल्यावर त्याला राग आला. विष्णूची पूजा न करण्याबाबत त्याने अनेकदा प्रल्हादला सुनावले. परंतु प्रल्हादने त्याचे ऐकले नाही. हिरण्यकश्यपूने प्रल्हादला कठोर शिक्षा देऊनसुद्धा काही उपयोग झाला नाही. हिरण्यकश्यपूने प्रल्हादला मारण्यासाठी आपल्या बहिणीची, म्हणजे होलिकेची मदत घेतली. होलिकेला शंकराकडून वरदान प्राप्त झाले होते. वरदान म्हणून तिला अशी चादर मिळाली होती, जी पांघरताच अग्नी संबंधित व्यक्तीला जाळू शकणार नाही. होलिकेने ती चादर पांघरून प्रल्हादला मांडीवर घेतले आणि आगीत जाऊन बसली. परंतु ती चादर तिच्या अंगावरून निसटून प्रल्हादच्या अंगावर येऊन पडली आणि प्रल्हादऐवजी होलिका जळून गेली. ईश्वरभक्त प्रल्हादच्या स्मृतिप्रीत्यर्थ या दिवशी होळी पेटविली जाते. प्रल्हाद या शब्दाचा अर्थ संतांनी आणि साहित्यिकांनी ‘आनंद’ असा मानला आहे. छळ आणि अत्याचाराचे प्रतीक असणारी होळी जळते आणि प्रेमाचे प्रतीक असणारा प्रल्हाद म्हणजे आनंद अक्षय्य राहतो. श्रीकृष्णाने या दिवशी पुतना नामक राक्षसीचा वध केला होता, असेही मानले जाते. याच आनंदात गोप-गोपिकांनी रासलीला आणि रंग खेळला होता. होळी हा केवळ रंगांचा सण नव्हे, तर भारताची संस्कृती आणि रीतिरिवाजाशी जोडलेला हा सण आहे. ग्रामीण भागात, विशेषतः उत्तर भारतातील गावांत अर्धे कच्चे धान्य आगीत भाजून खाण्याचा रिवाज आहे. त्या धान्याला ‘होला’ असे म्हटले जाते.
जाणकार असे सांगतात की, नवधान्य सस्येष्टीचा हा सण आहे. या शब्दाचा अर्थ ‘नवे धान्य किंवा पिकाचे हवन’ असा आहे. वैदिक काळात याला ‘नवान्नसस्येष्टी यज्ञ’ असे म्हटले जात असे. नव्याने तयार झालेले कच्चे धान्य यज्ञात दान करून प्रसाद म्हणून ग्रहण केले जात असे. याच धान्याला ‘होला’ असे म्हटले जात असल्यामुळे या सणाला ‘होलिकोत्सव’ असे नाव देण्यात आल्याचे सांगितले जाते. आता मात्र हा पूर्णपणे रंगांचा सण होऊन गेला आहे. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर राहणारे भारतीय समूहसुद्धा या दिवशी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने होळी साजरी करतात. सर्व भेदाभेद विसरून एकत्र येतात. होलिका दहनाच्या दुसर्या दिवशी होळी खेळली जाते. या दिवसाला धुळवड किंवा धूलिवंदन असे म्हणतात. यावेळी लोक एकमेकांना रंग, अबीर-गुलाल लावतात, ढोल वाजवतात आणि होळीगीते गातात. घरोघरी जाऊन एकमेकांना रंग लावला जातो. नव्या पिकाच्या आनंदाबरोबरच वसंताच्या आगमनाचेही निदर्शक म्हणजे होळी. निसर्गही या काळात वेगवेगळ्या रंगांची उधळण करीत असतो. फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि नव्या वर्षाची, नव्या पालवीची चाहूल याच महिन्यात लागते. त्यामुळेच होळीचे एक प्रचलित नाव ‘फाल्गुनी’ हेही आहे. वसंत पंचमीपासून हा उत्सव सुरू होतो. त्या दिवशी लोक सर्वप्रथम गुलाल उधळतात. शेतातील नवीन पिकामुळे केवळ माणसेच नव्हे तर पशू-पक्षीही उल्हसित झालेले असतात. लोक पारंपरिक संगीताच्या तालावर नृत्ये करतात. वर्षाचा अखेरचा सण असला तरी नव्याची चाहूल लागल्यामुळे सर्वांच्या मनात उत्साहाचे वातावरण असते. होळीच्या पर्वाच्या पहिल्या दिवशी होळी पेटविली जाते. चौकाचौकात लाकडे गोळा करून होळी केली जाते. याखेरीज होळीत आणखीही काही पदार्थ जाळण्याचा प्रघात आहे. गायीच्या शेणापासून केलेल्या गोवर्या यात प्रामुख्याने असतात. या गोवर्यांच्या मध्यभागी छिद्र असते. त्या छिद्रांमधून दोरी ओवून माला तयार केली जाते.
होळी पेटविल्यानंतर बहिणी ही माला भावांवरून ओवाळून आगीत टाकतात. भावांवर पडू शकणार्या वाईट नजरेपासून त्यांचे रक्षण व्हावे, अशी भावना यातून व्यक्त केली जाते. लाकडे आणि गोवर्यांनी बनविलेल्या या होळीची दुपारपासूनच पूजा केली जाते. सायंकाळी होळी पेटविली जाते. नव्याने आलेले पीक, विशेषतः गहू आणि हरभरा त्यात भाजला जातो. होळीचे दहन हे समाजातील सर्व वाईट वृत्तींचे दहन मानले जाते. दुसर्या दिवशी गुलाल आणि रंगांच्या सहाय्याने होळी खेळली जाते. देशाच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने होळी खेळली जाते. मथुरा आणि वृंदावन येथे ब्रज होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. येथे बांके बिहारी मंदिरात विशेष होळी खेळली जाते. ब्रजभूमीतील ही होळी जगप्रसिद्ध आहे. यावेळी महिलांवर पुरुष रंग उडवितात तर महिला लाठ्या आणि कापडाच्या सहाय्याने तयार केलेल्या चाबकाने पुरुषांना मारतात आणि पुरुष त्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात. हा सण राधा-कृष्णाच्या प्रेमाची आठवण करून देतो. मथुरा आणि वृंदावन येथे पंधरा दिवस होळीचा उत्सव रंगतो. वृंदावन येथे राहणार्या विधवा देशाच्या विविध भागांमधून आलेल्या असतात. त्या ज्या भागातून आलेल्या असतात, तिथे रूढीवादी समाजामुळे त्यांना धार्मिक कार्यक्रमांत सहभागी करून घेतले जात नाही. परंतु वृंदावन येथे या विधवा महिला मंदिरांमध्ये जाऊन देवाबरोबर रंग खेळतात. पांढर्या साड्या नेसलेल्या होळीचा गुलाल त्या पांढर्या वस्त्रावर पसरतो. श्रीकृष्णाबरोबर या महिला फुलांची होळी खेळतात. दक्षिण गुजरातमधील आदिवासीबहुल भागातसुद्धा होळी हाच महत्त्वाचा सण मानला जातो. गुजरातमध्ये होळीच्या दिवशी विशेषतः गुजिया आणि फाफडा-जिलेबी यांसारखे गोड पदार्थ बनवले जातात. द्वारकाधीश मंदिरात कृष्णाशी संबंधित पारंपरिक विधी पार पडतात. महाराष्ट्रात कोकणात विशेषतः मांदेली नृत्य आणि लोकगीते यांचा समावेश असतो.
मध्य प्रदेशातील मालवा आणि निमाड भागात भगोरिया उत्सव होळीच्या आधी साजरा केला जातो. हा उत्सव विशेषतः आदिवासी समाजामध्ये प्रसिद्ध आहे, जिथे तरुण-तरुणी एकमेकांना रंग लावतात आणि आपला जोडीदार निवडतात. उज्जैन आणि इंदूरमध्येही मोठ्या प्रमाणावर होळी खेळली जाते. पश्चिम बंगालमध्ये होळीला दोल यात्रा किंवा दोल पूर्णिमा म्हणतात. या दिवशी लोक श्रीकृष्ण आणि राधेची पूजा करतात आणि त्यांची मूर्ती रंगांनी सजवून पालखीत फिरवतात. शांतिनिकेतन येथे रवींद्रनाथ टागोर यांनी सुरू केलेला ‘बसंत उत्सव’ देखील होळीच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात साजरा होतो. छत्तीसगडमध्ये होळीला खास लोकगीते गायिली जातात. मध्य प्रदेशातील माळवा प्रांतातील भगोरिया या आदिवासी भागात तसेच बिहार आणि झारखंडमध्ये होळीला फगवा म्हणतात. येथे होळी खेळताना भोजपुरी गाणी, ढोल आणि मांदलीच्या तालावर नृत्य केले जाते. लोक ‘भांग ठंडाई’ आणि गोड पदार्थांचा आनंद घेतात. लोक आपली दुःखे विसरून होळीचा रंग धारण करून आनंदात नाचतात आणि आपली सांस्कृतिक ओळख जगाला सांगतात. हिमाचलमध्ये टोली नावाने प्रसिद्ध असलेली होळी साजरी केली जाते. कांग्रा आणि मंडी भागात होळी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. उत्तराखंडमध्ये होळीची दोन वैशिष्ट्यपूर्ण रूपे आहेत. खाडी होळी आणि बैठकी होळी. बैठकी होळी ही संगीत आणि भजनांच्या माध्यमातून साजरी केली जाते. खाडी होळी म्हणजे पारंपरिक वेशभूषा करून खेळली जाणारी रंगांची होळी. अनिवासी भारतीय जगाच्या कोणत्याही कानाकोपर्यात असले, तरी होळीच्या दिवशी आपापल्या भागात ते एकत्र येऊन रंग खेळतात. परदेशातील लोकांनाही या सणाची गोडी लागली आहे. आपले हे सांस्कृतिक वैभव आज जगभरात पोहोचले आहे.