Holi Special Trains 2026 | होळीनिमित्त राज्यात १,४१० हून अधिक विशेष रेल्वे गाड्या धावणार
नवी मुंबई: येणाऱ्या होळीच्या सणादरम्यान प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि अडथळाविरहित व्हावा यासाठी भारतीय रेल्वेने आपल्या संपूर्ण जाळ्यामध्ये १,४१० हून अधिक 'होळी विशेष' गाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. ही संख्या १,५०० पर्यंत वाढवण्यात येणार आहेत. सणासुदीच्या काळात वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन आणि प्रमुख ठिकाणांदरम्यान सुरळीत कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी या विशेष सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष गाड्या मार्च महिन्यात धावणार आहेत.
गेल्या वर्षी, म्हणजेच होळी २०२५ साठी, एकूण १,१४४ विशेष फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या. /रेल्वे विभागानुसार (झोन) यंदा पूर्व मध्य रेल्वे सर्वाधिक २८५ विशेष गाड्या, पश्चिम रेल्वे २३१ गाड्या, मध्य रेल्वे २०९ विशेष गाड्या, दक्षिण मध्य रेल्वे १६० सेवा, उत्तर रेल्वे १०८ गाड्या, तर उत्तर पश्चिम रेल्वे ७१ गाड्यांचा समावेश असणार आहे.
कनेक्टिव्हिटी अधिक बळकट करण्यासाठी, उत्तर मध्य रेल्वे ६६ विशेष गाड्या चालवणार आहे, तर ईशान्य रेल्वे आणि पूर्व किनारपट्टी रेल्वे प्रत्येकी ६२ गाड्या चालवतील. दक्षिण पश्चिम रेल्वे ४७, तर पश्चिम मध्य रेल्वे ४३ गाड्यांचे नियोजन करत आहे. दक्षिण रेल्वे ३९ आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे १५ सेवा चालवणार आहे. याव्यतिरिक्त, कोकण रेल्वे ९ विशेष गाड्या आणि ईशान्य सीमा रेल्वे प्रादेशिक मागणी पूर्ण करण्यासाठी २ गाड्या चालवणार आहे. मोठ्या सणांच्या काळात प्रवाशांची सोय, सुरक्षा आणि कार्यक्षम कामकाज सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वे कटिबद्ध आहे.

