Nanded news : जिल्ह्यात चिमण्यांची गणना २५ मार्चपर्यंत file photo
नांदेड

Nanded news : जिल्ह्यात चिमण्यांची गणना २५ मार्चपर्यंत

शिक्षक-पालकांच्या साहाय्याने चिमुकले शोधणार चिऊताईंना

पुढारी वृत्तसेवा

Nanded News: Sparrow Census in the District Until March 25

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: २० मार्च हा जागतिक चिमणी दिवस यानिमित्ताने जिल्ह्यातील चिमण्यांची गणना करण्याचा प्रयोग ऑनलाईन पद्धतीने प्रथमच करण्यात येत आहे. या गणनेची शिक्षकांवर जबाबदारी टाकली गेली नसली तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकांच्या साहाय्याने चिमुकले विद्यार्थी आपल्या लाडक्या चिऊताईचा शोध घेणार आहेत. ऑनलाईन फॉर्ममध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे नेमकी नव्हे तर ढोबळमानाने देणे अपेक्षित आहे. प्राथमिक प्रयोग म्हणून याकडे पाहिले जात आहे.

२०१० मध्ये नेचर फॉरेव्हर या पक्षीसंवर्धन संस्थेने जागतिक चिमणी दिनाची सुरुवात केली. आज ५० पेक्षा अधिक देशांमध्ये हा कार्यक्रम पोहोचला आहे. भारतातही चिमण्यांचे प्रमाण तब्बल ७० ते ८० टक्के कमी झाले आहे. दोन ते अडीच दशकांपूर्वी चिमणी हा घराघरातील कॉमन बर्ड म्हणून ओळखला जाणारा पक्षी होता.

चिमण्यांवर अनेक कवींनी कविताही लिहिल्या आहेत. काऊचा घास आणि चिऊचा घास तर घरा-घरात चिमुकल्यांना आई भरवत असे. पण, आज शहरीकरण तसेच पिकांवर वापरले जाणारे पेस्टीसाईड्स यामुळे चिमण्यांच्या अन्नसाखळीवर परिणाम झाला असून झाडांच्या घटत्या संख्येमुळे त्यांचा अधिवास हरवत चालला आहे. त्यामुळेच सायंकाळचा चिमण्यांसह पोपटांचा किलबिलाट अपरिचित झाला आहे. हे चित्र बदलून पुन्हा चिमण्यांची संख्या वाढावी यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चिमणी गणना करण्यात येत आहे.

विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग नांदेड व महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यात प्रथमच ऑनलाईन चिमणी गणना करण्यात येणार आहे. गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून या अनोख्या उपक्रमाला सुरूवात झाली असून दि. २५ मार्चपर्यंत अंदाजे किंवा सुमारे स्वरुपात ही गणना करावयाची आहे. त्यासाठी गुगलवर स्वतंत्र अर्ज देण्यात आला असून त्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ऑनलाईन भरायची आहेत.

चिमणी संवर्धनाबाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने या ऑनलाईन सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले असून हा ऑनलाईन सर्वे फक्त नांदेड जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे कार्यकारिणी सदस्य अमोल सावंत यांची ही संकल्पना आहे. ऑनलाईन अर्जात विचारलेले प्रश्न मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत विचारण्यात आले आहेत.

अनुकूल वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न हवेत शहरातच काय पण गावखेड्यातसुद्धा चिमण्या, साळुंक्या, पोपट यासारखे पक्षी कमी झालेत. कारण त्यांची अन्नसाखळी तुटत चाललीय. शिवाय अधिवासांनाही धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांना अन्न-पाणी ठेवण्याची गरज भासते आहे कारण निसगनि त्यांच्यासाठी जी व्यवस्था केली आहे, ती मानवामुळे उद्ध्वस्त झाली आहे. पण, अशा तोकड्या उपायांपेक्षा पशु-पक्ष्यांना अनुकूल वातावरण तयार केले. अर्थात झाडांची संख्या वाढवली तर आपोआप पुन्हा ती चिमणी दिवसं परत येतील.
- कविता जोशी, पर्यावरणप्रेमी अभ्यासिका, नांदेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT