

Bird watching inaugurated the bird festival in Sonewadi; bird lovers' enthusiasm increased
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील अनेक पक्षीप्रेमींनी रविवारी (दि. २२) सकाळी सोनेवाडीकडे (जायकवाडी) मोर्चा वळविला. यंदा कोणते पक्षी दर्शन देऊन सुखावणार याचीच सर्वांना प्रतीक्षा होती. दरवर्षी या काळात दिसणाऱ्या पक्ष्यांनीही पक्षीप्रेमींना निराश केले नाही. वारकरी, पाणकावळे, राखी बगळा, जांभळा बगळा, जांभळी पाणकोंबडी, नदी सुरय, उघड्या चोचीचा करकोचा अशा विविध रंगीबेरंगी पक्षांनी शहरातील पक्षीप्रेमींना दर्शन दिले.
एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन आणि एज्युकेशनल अकॅडमीच्या ११ व्या पक्षी महोत्सवाचे उद्घाटन रविवारी पक्षी निरीक्षणाने झाले. जायकवाडी पक्षी अभयारण्य भागातील सोनेवाडी येथे पक्षी निरीक्षण आयोजित करण्यात आले होते. या पक्षी महोत्सवात १ मार्चपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. इको सत्व संस्था आणि वन विभागही महोत्सवात सहभागी झाला आहे. रविवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत सोनेवाडी (जायकवाडी) येथे पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम झाला.
यावेळी एमआयटी आणि एमजीएम महाविद्यालयातील अभियांत्रिकीचे विद्यार्थी आणि सामान्य पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी ईआरएफईए संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप यार्दी, इकोसत्व संस्थेच्या संस्थापिका गौरी मिराशी, प्रियंका वझे, वन विभागाच्या वन्यजीव विभागातर्फे रेवती कुलकर्णी, प्रमिला मोरे, राहुल सपकाळ आणि निवृत्त वनअधिकारी रमेश सोनटक्के, पैठण शहरातील पक्षी अभ्यासक सुनील पायघन आणि अर्जुन कुचे आदी उपस्थित होते.
पक्षीप्रेमींचे चेहरे खुलले
यावेळी विविध प्रकारचे पक्षी दिसल्याने पक्षीप्रेमींचे चेहरे खुलले होते. जांभळी पाणकोंबडी, नदी सुरय, उघड्या चोचीचा करकोचा, पांढऱ्या मानेचा करकोचा, वारकरी, पाणकावळे, राखी बगळा, जांभळा बगळा, थापट्या बदक, तलवार बदक, तरंग बदक, रंगीत करकोचा, दलदली भोवत्या यासह विविध पक्षी दिसून आले.
मोठ्या दुर्बिणीतून बघण्याची उत्सुकता
या पक्षी निरीक्षणावेळी ईआरएफईएतर्फे पक्षीप्रेमींना पक्षी अगदी जवळून बघितल्याचा आनंद घेता यावा यासाठी मोठ्या दुर्विणीची व्यवस्था करण्यात आली होती. वन विभागातर्फे लांब पल्ल्याच्या दुर्बिणींची सोय करण्यात आली होती. जमलेला प्रत्येक जण या दुर्बिणीतून पक्ष्यांना निरखून बघण्यासाठी उत्सुक असलेला दिसला. पक्ष्याचे डोळे, चोच, पंख आदी या दुर्बिणीतून स्पष्ट दिसत असल्याने प्रत्येक जण यावरच चर्चा करताना दिसला.